शिवसेनेला बाजूला ठेऊन शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही, उद्धव ठाकरेंचा निशाणा

162

मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी शिवसेना भवनमध्ये पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेत जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नवीन सरकारबाबत पुन्हा एकदा भाजपावर टीका केली आहे. शिवसेनेला बाजूला ठेऊन शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.

हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही

आता जे भाजपासोबत गेले आहेत त्यांनी हा प्रश्न स्वतःच्या मनाला विचारलं पाहिजे, की ज्यांनी अडीच वर्षांपूर्वी शब्द मोडला आणि असा पाठीत वार करुन शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण करुन, शिवसेनेचा मुख्यमंत्री अशी घोषणा करण्यात येत आहे, तसा हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही. कारण शिवसेनेला बाजूला ठेऊन शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि भाजपाला इशारा दिला आहे.

(हेही वाचाः हा फक्त ट्रेलर… मोठा ‘शोले’ येणं अजून बाकी आहे, भाजप नेत्याच्या विधानाने खळबळ)

…तर हे सन्मानाने झालं असतं

ज्या पद्धतीने नवीन सरकार स्थापन झालं आणि ज्यांनी हे सरकार स्थापन केलं त्यांच्या मते त्यांनी तथाकथित शिवसैनिकाला त्यांनी मुख्यमंत्री केलं. मग हेच मी अडीच वर्षांपूर्वी सांगितलं होतं. मुख्यमंत्रीपदाचा अडीच वर्षांचा कार्यकाळ शिवसेना-भाजपने वाटून घ्यावा, अशी माझी आणि अमित शहा यांची चर्चा झाली होती. तसंच जर का झालं असतं तर आज जे घडलं ते सन्मानाने झालं असतं. मग त्यावेळी याला नकार देऊन आता हे भाजपाने का मान्य केलं, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

तर मविआचा जन्मच झाला नसता

शिवसेना-भाजपाची अधिकृत युती होती. 2019 च्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीपूर्वी जे ठरलं होतं, ते जर तेव्हाच केलं असतं तर महाविकास आघाडीचा जन्मच झाला नसता, मला कशाला उगाच मुख्यमंत्री व्हायला लावलं, असाही सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

(हेही वाचाः “मी पळपुटा नाही, माझा ED वर विश्वास”; चौकशीपूर्वी राऊतांचा सूर बदलला)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.