शिवसेना आता योगींना टक्कर देणार! पण राज्याबाहेर शिवसेनेची ‘ही’ अवस्था

79

महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. आता उत्तर प्रदेशमध्ये देखील शिवसेनेने निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे. शिवसेनेने उत्तर प्रदेशातील 403 जागांवर निवडणूक लढवण्याची घोषणा केली असून, तसे पत्रकच शिवसेनेने काढले आहे. एकीकडे शिवसेनेने उत्तर प्रदेश निवडणुकीची घोषणा केलेली असताना, आजवर शिवसेनेने ज्या निवडणुका इतर राज्यात लढल्या त्यामध्ये शिवसेनेच्या उमेदवाराला साधे डिपॉझिट देखील राखता आलेले नाही. राज्याबाहेरील निवडणुकांमध्ये शिवसेनेची नेमकी काय अवस्था झाली ती जाणून घ्या.

बिहारमध्ये ‘तुतारी’ फूस

गेल्यावर्षी पार पडलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये देखील शिवसेनेची तुतारी वाजली नाही. शिवसेनेने बिहारमध्ये 23 जागांवर निवडणूक लढवली होती. त्यातील 22 जागांवर त्यांना नोटापेक्षाही कमी मते मिळाली. शिवसेना या निवडणुकीत चर्चेत आली होती ती वेगळ्याच कारणाने. या निवडणुकीत शिवसेना त्यांच्या निवडणूक चिन्हावरुन चर्चेत आली होती. शिवसेनेचे निवडणूक चिन्ह हे धनुष्यबाण आहे, तर बिहारमधील प्रमुख सत्ताधारी राजकीय पक्ष जेडीयूचे चिन्ह बाण आहे. तसेच झारखंड मुक्ती मोर्चाचे चिन्ह देखील धनुष्यबाण आहे. यावरुन गोंधळ होऊ नये म्हणून निवडणूक आयोगाने शिवसेनेला चिन्ह बदलून दिले होते. त्यांना बिस्कीट हे चिन्ह देण्यात आले. मात्र, या चिन्हावर आक्षेप घेत शिवसेनेने चिन्ह बदलून मागितले होते. त्यानंतर शिवसेनेला तुतारी वाजवणारा मावळा हे चिन्ह देण्यात आले होते.

(हेही वाचाः उत्तर प्रदेशातही फडकणार शिवसेनेचा भगवा?)

दिल्लीतही फुसका बार

गेल्याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात पार पडलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत देखील शिवसेनेला आपला प्रभाव पाडता आला नव्हता. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेनंही दिल्ली विधानसभेत उमेदवार उतरवले होते. मात्र, दोन्ही पक्षाच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते. शिवसेनेच्या 5 उमेदवारांच्या मतांची बेरीज 19 हजार 15 एवढी होती. त्यापैकी, चार उमेदवारांना मिळून फक्त 971 मते मिळाली. तर एका उमेदवाराने 18 हजार 44 मते घेतली होती. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी बुराडी मतदारसंघातून शिवसेनेकडून धरम वीर हे उमेदवार होते. केवळ त्यांनाच काही प्रमाणात लोकांनी पसंती दिली होती. धरम वीर यांना 18 हजार 44 मते मिळाली आहेत. मात्र, तरीही त्यांचं डिपॉझिट जप्त झालं होतें. करोल बाग मतदारसंघातून गौरव यांना 192 मतेच मिळाली. चांदणी चौक मतदारसंघात अनिल सिंग जादोन या शिवसेना उमेदवारास फक्त 242 मतं मिळाली. विकासपुरी मतदारसंघातून संजय गुप्ता यांना 422 मतं मिळाली. तर, मालबिया नगर येथील मोबिन अली यांना 115 मते मिळाली. त्यामुळे, शिवसेनेच्या 5 पाचही उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते.

(हेही वाचाः निवडणुकीसंदर्भात आयोगाकडे मुंबई महापालिकेची ‘ही’ आहे मागणी)

गुजरातमध्ये डिपॉझिट जप्त

2017 साली  गुजरातमध्ये भाजपची डोकेदुखी वाढवण्यासाठी शिवसेनेने विधानसभा निवडणुकीसाठी 36 जागांवर पक्षाचे उमेदवार उभे केले होते. परंतु या निवडणुकीत शिवसेनेला जबर फटका बसला होता. सर्वच उमेदवारांचं डिपॉझिट जप्त होण्याची वेळ शिवसेनेवर आली होती. महत्त्वाचं म्हणजे 36 उमेदवारांना मिळून जवळपास फक्त 28 हजार 660 मतं मिळाली होती. ही मते एकूण मतदानाच्या 0.08 टक्के होती. तर शिवसेनेच्या केवळ आठ उमेदवारांनाच एक हजार मतांचा ओलांडता आला. यापैकी लिंगायत मतदारसंघातील सम्राट पाटील यांना सर्वाधिक 4 हजार 75 मतं पडली होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.