सातमकरांवर पुन्हा शिवसेनेने केला अन्याय: विभागप्रमुख पदावरून हटवून प्रमोद शिंदेंची नियुक्ती

156

शिवसेनेत उभी फूट पडत दोन गटांमध्ये विभागणी झाल्यानंतर आता शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुखांचा आता कुणावरच विश्वास नाही. त्यामुळे आजवर कडवट शिवसैनिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना तडकाफडकी पदावरुन हटवले जाणार आहे. शिवसेनेचे शीव कोळीवाडा, चेंबूर आणि अणुशक्ती नगर विधानसभा क्षेत्राचे विभागप्रमुख मंगेश सातमकर यांना यापदावरून हटवून उपविभागप्रमुख असलेल्या प्रमोद शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे सातमकर हे प्रचंड नाराज असून शिंदे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आदित्य ठाकरे यांच्या उपस्थित केलेल्या पहिल्या कार्यक्रमालाही सातमकर यांनी पाठ फिरवल्याने या नाराजीची चर्चा मोठ्या प्रमाणात ऐकायला मिळत आहे.

शिवसेनेच्या मुबईतील अँटॉप परिसरातील नगरसेवक असलेले मंगेश सातमकर यांच्याकडे मागील काही वर्षांपासून शीव कोळीवाडा, चेंबूर आणि अणुशक्ती नगर आदी विधानसभा क्षेत्राच्या विभागप्रमुख पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यामुळे नगरसेवक पद सांभाळतानाच पक्षाची संघटनात्मक बांधणीसाठी सकारात्मक प्रयत्न करणाऱ्या मंगेश सातमकर यांना मागील २० जानेवारी रोजी विभागप्रमुख पदावरून बाजुला करत अणुशक्ती नगर विधानसभा क्षेत्राच्या उपविभाग प्रमुख जबाबदारी सांभाळणाऱ्या प्रमोद शिंदे यांच्यावर या आता तिन विधानसभा क्षेत्राची संघटनात्मक बांधणी करण्याची जबाबदारी सोपवली आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेनेतून फुटून शिंदे गटात सामील झालेल्या खासदार राहुल शेवाळे यांनी मातोश्रीसह आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केल्यानंतरही त्याविरोधात सातमकर यांनी त्यांचा समाचार घेतला नाही. ही बाब मातोश्रीला खटकली आणि बाळासाहेबांच्या जयंतीपूर्वीच सातमकर यांना पदावरून बाजुला करत उपविभागप्रमुख प्रमोद शिंदे यांची नियुक्ती केल्याची माहिती मिळत आहे.

( हेही वाचा: देशातील सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री ठरले योगी आदित्यनाथ; वाचा दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर कोण? )

मंगेश सातमकर यांच्यावर शिवसेनेकडून सातत्याने अन्यायच होत आलेला आहे. रविंद्र वायकर यांच्या स्थायी समिती अध्यक्षपदानंतर मंगेश सातमकर यांचे नाव प्रथम चर्चेत होते. परंतु सातमकर यांचा पत्ता कापून राहुल शेवाळेंना स्थायी समितीचे अध्यक्षपद देण्यात आले. त्यानंतर २०१२ मध्ये त्यांची उमेदवारी कापून माजी महापौर श्रध्दा जाधव यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर सन २०१७ मध्ये निवडून आल्यानंतर स्थायी समितीचा प्रबळ दावेदार म्हणून सातमकर यांचे नाव होते आणि ते उमेदवारी अर्ज भरण्यास गेलेले असतानाही आयत्या वेळी मातोश्रीने रमेश कोरगावकर यांना उमेदवारी जाहीर केली. पुढे ही नाराजी शिक्षण समितीचे अध्यक्षपद देऊन दूर करण्याचा प्रयत्न झाला. परंतु एकीकडे महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या प्रस्थापुढे निभाव न लागणाऱ्या सातमकर यांनी आपल्या विभागातील  विकासकामे आणि विभागप्रमुख म्हणून संघटनात्मक बांधणीला झोकून दिले होते. परंतु शेवाळेंबाबत असलेल्या सॉफ्ट कॉर्नरचा आधार घेत पक्षाने त्यांना बाजुला करत एकप्रकारे एका निष्ठावान शिवसैनिकाला बाळासाहेबांच्या शिवसेनेत जाण्यास प्रवृत्त केले,अशाप्रकारची चर्चा विभागांमधून ऐकायला मिळत आहे.

राहुल शेवाळे  दक्षिण मध्य मुंबईचे खासदार असून सातमकर ज्या तीन विधानसभा क्षेत्राचे विभागप्रमुख होते ते विधानसभाही त्यांच्या लोकसभा मतदार संघात येत आहेत. त्यामुळे शेवाळे यांच्याकरता सातमकर यांचा प्रवेश महत्वाचा ठरू शकतो, परंतु हाडाचे शिवसैनिक असलेल्या सातमकर यांना बाळासाहेबांच्या शिवसेनेत जाणे आवडेल का हाही तेवढाच प्रश्न आहे. त्यामुळे नाराज सातमकर आता काय निर्णय घेतात याकडे त्यांचा कार्यकर्ता वर्ग आणि जनतेचे लक्ष आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.