दादर-माहिम,धारावी आणि वडाळ्याच्या शिवसेना विभागप्रमुखपदी महेश सावंत; पक्षातील निष्ठावान शिवसैनिकांवर मात्र पक्षाचा अविश्वास

124

धारावी, माहिम-दादर आणि वडाळा या तीन विधानसभा मतदार संघाच्या शिवसेना विभाग क्रमांक १०च्या विभागप्रमुखपदी माजी शाखाप्रमुख महेश सावंत यांची पक्षाने नियुक्ती केली आहे. महेश सावंत हे शिंदे गटात सामील झालेल्या आमदार सदा सरवणकर यांचे कट्टर विरोधक समजले जात असून, सदा सरवणकर यांनी विभागप्रमुख पदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त होते. त्यामुळे या विभाग क्रमांक १०च्या विभागप्रमुखपदी आमदार सुनील शिंदे यांची नियुक्ती करण्याचा प्रयत्न असला तरी प्रत्यक्षात त्यांनी नकार दिल्यामुळे अखेर सावंत यांच्या गळ्यात विभागप्रमुख पदाची माळ घालण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे. परंतु काँग्रेसमधून जाऊन आलेली व्यक्ती कट्टर शिवसैनिक कशी अशी चर्चाच आता शिवसैनिकांमध्ये सुरु आहे.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह शिवसेनेचा स्वतंत्र गट स्थापन करत राज्यात भाजपसोबत सरकार स्थापन केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात दादर- माहिमचे शिवसेना आमदार  व विभाग क्रमांक १०चे शिवसेना विभागप्रमुख सदा सरवणकर सामील झाल्यानंतर त्यांनी आपल्या विभागप्रमुख पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर  विभागप्रमुख पद  रिक्तच होते. या विभागप्रमुख पदासाठी उपविभाग प्रमुख राजू पाटणकर तसेच माजी महापौर मिलिंद वैद्य, माजी नगरसेवक प्रकाश पाटणकर आदींची नावे चर्चेत होती. परंतु यापैकी कुणावरही विश्वास नसल्याने शिवसेनेने विधान परिषद सदस्य सुनील शिंदे यांच्यावर विभागप्रमुख पदाची जबाबदारी सोपवण्याचा विचार केला होता. परंतु विभागाच्या बाहेरील व्यक्तीला विभागप्रमुख बनवण्याची आजवरची परंपरा नसल्याने, तसेच विभागातील नेत्यांवर अविश्वास दाखवण्यासारखे होईल, याच विचाराने शिवसेनेत सदा सरवणकर यांचे एकेकाळचे विश्वासू शाखाप्रमुख, परंतु त्यानंतर समाधान सरवणकर यांना पुन्हा उमेदवारी दिल्याने बंडखोरी करत सरवणकर यांना आव्हान देणाऱ्या महेश सावंत यांना विभागप्रमुख बनवण्याचा निर्णय घेतला. याची अधिकृत घोषणा दोन दिवसांपूर्वी पक्षाच्या मुखपत्रामधून करण्यात आली. त्यानंतर महेश सावंत यांनी बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाला भेट दिली.

सन २०१२च्या निवडणुकीत काँग्रेसच्या तिकीटावर लढणाऱ्या महेश सावंत यांचा मनसेचे संतोष धुरी यांनी पराभव केला होता. त्यानंतर २०१७च्या निवडणुकीत समाधान सरवणकर यांनी प्रभाग १९४ मधून उमेदवारी दिल्याने, महेश सावंत यांनी अपक्ष निवडणूक लढवत आव्हान दिले. त्यात समाधान सरवणकर हे विजयी झाले, पण तेव्हापासून महेश सावंत हे सरवणकर यांच्यापासून दूर गेले. त्यामुळे सरवणकर व सावंत हे राजकीय हितशत्रू अशाप्रकारे विभागात पाहिले जात होते. त्यामुळे सदा सरवणकर यांना आव्हान देत त्यांच्यासमोर विभागप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यासाठी महेश सावंत हीच व्यक्ती योग्य असल्याचे शिवसेनेच्या सुनिल शिंदे यांच्यासह अनेकांनी पक्षाच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांचे नावे निश्चित झाल्याचे बोलले जात आहे.

( हेही वाचा: सावधान: सिडकोच्या नावाने आलेली लिंक उघडू नका )

महेश सावंत यांच्यावर दादर-माहिम, धारावी व वडाळा या तीन विधानसभेच्या विभागप्रमुखांची जबाबदारी सोपवली असली तरी सावंत यांची ओळख प्रभादेवी वगळता कुठेच नाही. आजवर शाखाप्रमुख पद भूषवणाऱ्या सावंत यांच्याकडे नेतृत्व क्षमता नसल्याने, ते विभाग प्रमुख म्हणून किती पसंतीला उरतात आणि पक्षाला बळकटी देतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. आजच्या परिस्थितीत आक्रमक विभागप्रमुखाची गरज असून, महेश सावंत हे बचावात्मक भूमिकेतून पाऊल टाकणारे असल्याने त्यांच्यासाठी हे पद सांभाळणे हे एक आव्हानच ठरेल, असेही स्थानिक शिवसैनिकांचे म्हणणे आहे.

आजवर विनोद खोपकर, चंद्रकात विश्वासराव, मिलिंद वैद्य तसेच सदा सरवणकर यांच्या रांगेत महेश सावंत यांना बसवण्यापूर्वी वडाळा येथील कट्टर शिवसैनिक असलेले विलास राणे, सुरेश काळे, धारावीतील राजेंद्र सुर्यवंशी, वसंत नकाशे  आदींचा विचार होणेही आवश्यक होते. परंतु महेश सावंतच्या नावाला पसंती देताना, अशा पदाधिकाऱ्यांवर अप्रत्यक्ष अविश्वासच पक्षाने दाखवला असल्याची चर्चाही शिवसैनिकांमधून ऐकायला मिळत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.