शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यासंदर्भातील सुनावणी पुढे ढकलली, उच्च न्यायालयात या दिवशी होणार निर्णय

गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील दादर येथे असणाऱ्या शिवतीर्थावर दसरा मेळावा नक्की कोणाचा होणार याकडे साऱ्याचे लक्ष लागले आहे. शिवाजी पार्कचे मैदान मिळावं यासाठी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात चांगलीच रस्सी खेच सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी कोणाला परवानगी मिळणार, यावर बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार होती, पण ती सुनावणी लांबणीवर गेली आहे. कारण आजची होणारी सुनावणी शुक्रवारी ढकलल्याची माहिती समोर येत आहे.

(हेही वाचा – ‘तिघं मिळून मला संपवू शकला नाहीत, यापुढेही संपवू शकत नाहीत’, फडणवीसांचा ठाकरेंवर निशाणा)

यादरम्यान, शिवसेना सुधारित याचिका दाखल करणार असल्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळे शुक्रवारी दुपारी १२ वाजेनंतर मुंबई उच्च न्यायालयात होणाऱ्या दसऱ्या मेळाव्या संदर्भातील सुनावणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. तर बुधवारी शिवसेनेकडून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करत शिवसेनेच्या वतीने न्यायालयात दाद मागण्यात आली होती. मात्र या याचिकेवर आज, गुरूवारी सुनावणी होणं अपेक्षित होते. परंतु, ही सुनवाणी आज, गुरूवारऐवजी आता शुक्रवारी ढकलली गेली आहे. यामुळे शिवसेना सुधारित याचिका दाखल केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तसेच शिंदे गटाच्या वतीने आमदार सदा सरवणकर यांनी देखील मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. शिवतीर्थावर होणारा दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी मिळावी, अशी मागणी सदा सरवणकर यांनी केलेली होती. दरवर्षी सदा सरवणकर हेच शिवसेनेच्या वतीने दसरा मेळावा परवानगीसाठी पालिकेत अर्ज दाखल करत असतात. मात्र बंडखोरी केल्यानंतर सदा सरवणकर यांनी आपणच खरी शिवसेना आहोत, दरवर्षी प्रमाणे यंदाही आम्हाला दसरा मेळाव्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे. त्यामुळे सत्ता संघर्षानंतर आता शिवतीर्थावर मेळावा करता यावा यासाठी शिवसेनेला कायदेशीर लढाई लढावी लागणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here