मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता असली तरी भाजपच्या नगरसेवकांचा धसका त्यांनी घेतल्याचे आता दिसून येत आहे. भांडुपमधील प्रसुतीगृहामध्ये नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागाचा लोकार्पण सोहळा भाजप नगरसेविकांच्या धसक्याने घाईगडबडीत आटोपून घ्यावा लागला. प्रशासनाच्यावतीने याच्या उद्घाटनाचा कार्यक्रम न घेण्याचा निर्णय घेतला होता. परंतु भाजपच्या नगरसेविकांकडून सातत्याने असलेल्या पाठपुराव्याची दखल स्थानिक पातळीवर घेऊन महापौरांच्या हस्ते याचे लोकार्पण करत शिवसेनेने याचे श्रेय आपल्या गळ्यात पाडून घेण्याचा प्रयत्न केला.
भांडुप (पश्चिम)च्या सावित्रीबाई ज्योतिबा फुले प्रसूतिगृह येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या २० बेडच्या नवजात शिशू अतिदक्षता विभागाचे लोकार्पण मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते बुधवारी पार पडले. प्रारंभी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते फित कापून नवजात शिशू अतिदक्षता विभागाचे लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर महापौरांनी इतर नगरसेवकांसह संपूर्ण अतिदक्षता विभागाची पाहणी करुन डॉक्टरांसोबत चर्चा केली.
(हेही वाचाः राज्य शासनाकडूनच लसी कमी मिळतात… मुंबई महापालिकेने दिली माहिती)
भाजप नगरसेविकांचा पाठपुरावा
या प्रसुतीगृहात नवजात बालकांसाठी एनआयसीयू सुरू करण्याची मागणी या भागातील भाजपच्या नगरसेविका जागृती पाटील यांनी महिला व बाल कल्याण समितीच्या बैठकीत मांडून याचा पाठपुरावा सुरू केला. त्यांच्याबरोबरच स्थानिक भाजप नगरसेविका साक्षी दळवी यांचाही प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू होता. त्यामुळे हा विभाग आता सुरू करण्यात येणार असल्याने येथील कामांची पाहणी या दोन्ही नगरसेविकांसह भाजपच्या सारीका पवार यांनीही केली. मात्र, भांडुपमध्ये शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या भाजप नगरसेवकांच्या संख्येच्या तुलनेत अधिक असली, तरी प्रत्यक्षात त्यांनी कधीही या प्रसुतीगृहाला भेट दिली नाही.
शिवसेनेचा डाव फसला
भांडुपमध्ये भाजपच्या साक्षी दळवी व जागृती पाटील या दोनच नगरसेविका असून स्थानिक नगरसेविका या साक्षी दळवी आहेत. त्यामुळे याचे श्रेय भाजप नगरसेविकेला जाईल, या भीतीने शिवसेनेने प्रशासनातील अधिकाऱ्यांना हाताशी धरुन घाईगडबडीत उद्घाटनाचा बार उडवून दिला.परंतु भाजपच्या दोन्ही नगरसेविकांनी आधीच तिथे ठाण मांडल्याने शिवसेनेचा डाव फसला आणि या उद्घाटनात त्यांना सामील करुन घ्यावे लागले.
(हेही वाचाः भायखळ्यात शिवसेनेला धक्का, यामिनी जाधवांची आमदारकी जाणार?)
भाजप नगरसेवकांची शिवसेनेला भीती
महापालिकेच्या अधिनियमानुसार कोणत्याही वास्तूचे उद्घाटन करताना स्थानिक नगरसेविकाला अध्यक्षपद बहाल करण्याचा नियम आहे. परंतु प्रशासनातील सर्व अधिकारी उपस्थित असताना महापौरांनी हा कार्यक्रम शिवसेनेचा बनवून स्थानिक नगरसेविकेला अध्यक्षपदापासून डावलले. एवढेच नाही अध्यक्षपदाचा मान प्रभाग समिती अध्यक्षा दिपमाला बढे यांनी हिरावून घेत, साक्षी दळवी यांना बाजूला सारण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे भाजपच्या केवळ दोन नगरसेविकांना शिवसेनेला घाबरावे लागत असल्याची चर्चा, भांडुपसह राजकीय वर्तुळात ऐकायला मिळत आहे.
कोविडच्या पार्श्वभूमीवर याच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होणार नाही, असे संदेश प्रशासनाच्यावतीने देण्यात आले. परंतु बुधवारी दुपारी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना नगरसेवक,आमदार रमेश कोरगावकर, माजी खासदार संजय पाटील, शिवसेना नगरसेविका सुवर्णा करंजे, राजराजेश्वरी रेडकर, दिपमाला बढे, उमेश माने भाजप नगरसेविका साक्षी दळवी, जागृती पाटील, काँग्रेस नगरसेविका आशा कोपरकर, एस विभागाचे सहायक आयुक्त अजितकुमार आंबी, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे आदी उपस्थित होते.
(हेही वाचाः दोन महिने उलटूनही केवळ ९ ऑक्सिजन प्लांटची उभारणी)
Join Our WhatsApp Community