तब्बल दोन वर्षानंतर आखाड्यात कुस्तीचा खेळ रंगताना दिसणार आहे. आजपासून साताऱ्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धेला सुरुवात होणार आहे. कोरोनामुळे दोन वर्ष ही स्पर्धा भरवण्यात आली नव्हती. आता मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात असल्याने ही स्पर्धा भरवण्याचा निर्णय महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने घेतला आहे. अशातच पुरूषांचा सहभाग असलेल्या या खेळात महिला देखील वळताना दिसत आहेत. त्यामुळे आता महिलांनाही ‘महाराष्ट्र केसरी’ होण्याचा मान मिळणार असल्याची बातमी समोर येत आहे. 1969 पासून महाराष्ट्र केसरी ही कुस्ती स्पर्धा भरविण्यात येते. मात्र यामध्ये केवळ पुरूषांचा सहभाग असतो, आता महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी महिलांसाठी महाराष्ट्र केसरी स्पर्धा भरवण्याची मागणी केली आहे. मंगळवारी याबाबत त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेतली असून यावेळी त्यांनी लवकरच या संदर्भातली घोषणा होईल असे सांगितले.
(हेही वाचा – Gorakhnath Mandir Attack: युपी ATS चौकशीसाठी मुंबईत दाखल)
काय केली सय्यद यांनी मागणी?
दीपाली सय्यद यांनी महिलांसाठी महाराष्ट्र केसरी स्पर्धा भरवण्याची मागणी करताना याबाबत त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेतली. लवकरच या संदर्भातील घोषणा होईल, असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रात पहिल्यांदा महिला कुस्तीगीरांसाठीही संधी उपलब्ध होईल. हरियाणामध्ये कुस्तीगिरांना प्रोत्साहन देण्यासाठी इतक्या वेगवेगळ्या योजना चालवल्या जातात, महाराष्ट्रामध्येही क्षमता आहे, आपणही ते करायला पाहिजे, असेही सय्यद म्हणाल्या आहेत.
तब्बल 59 वर्षांनंतर साताऱ्याला मान
मंगळवारपासून साताऱ्यात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा रंगणार आहे. तब्बल 59 वर्षांनंतर साताऱ्याला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजनाचा मान मिळाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र केसरीची मानाची गदा पटकावण्यासाठी 900 पैलवान शड्डू ठोकून सज्ज आहेत. कुस्ती खेळासाठी भरवली जाणारी महाराष्ट्र केसरी ही मानाची स्पर्धा आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेला 1961 साली सुरुवात झाली. सुरुवातीला महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेकडून ही गदा विजेत्या मल्लाला दिली जात होती. कुस्ती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मामासाहेब मोहोळ यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र अशोक मोहोळ यांनी त्यांच्या वडीलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ही चांदीची गदा दरवर्षी देण्याची इच्छा व्यक्त केली. गदेची लांबी साधारणपणे 27 ते 30 इंच असते, तर व्यास 9 ते 10 इंच असतो. महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं जेतेपद पटकावणारा पैलवान ही गदा उंचावतो. या गदेचं वजन तब्बल 10 ते 12 किलो असतं.