नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेला कंटाळले असून, त्यांना आमच्यात घेऊ असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच भूकंप झाला होता. मात्र आता राणेंच्या वक्तव्यानंतर एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले असून, मला शिवसेनेत आणि मंत्री म्हणून संपूर्ण स्वातंत्र्य आहे, त्यामुळे राणेंच्या विधानात काही तथ्य नाही. हा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.
काय म्हणाले एकनाथ शिंदे?
मी पक्षात समाधानी आहे, राणेंनी जे सांगितले त्यात तथ्य नाही. ते पूर्णपणे चुकीचे आहे. मला जर स्वातंत्र्य नसतं तर मी हे निर्णय घेऊ शकलो नसतो. मातोश्री काय आणि उद्धव साहेब काय कोणीही माझ्या कामात हस्तक्षेप करत नाहीत, असे शिंदे म्हणाले. राणे स्वत: युती सरकारमध्ये मुख्यमंत्री होते. राज्याशी निगडीत मोठा निर्णय किंवा धोरणात्मक निर्णय घ्यायचा असतो, तेव्हा मुख्यमंत्र्यांना विचारावेच लागते. माझेच खाते नाही, कोणतेही खाते मुख्यमंत्र्यांच्या संमतीनेच सामूहिक निर्णय घेत असते, हे राणेंना माहीत असेल. एवढेच नव्हे तर ते उद्योग मंत्री आहेत, उद्या त्यांना मोठा निर्णय घ्यायचा असेल तर तो पंतप्रधानांना विचारुनच घ्यावा लागेल, असेही ते म्हणाले.
(हेही वाचाः शिवसेनेचा ‘हा’ मोठा नेता पक्षाला कंटाळलाय!)
विरोधकांचा प्रयत्न
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून सातत्याने संभ्रम निर्माण करण्याचा विरोधकांचा प्रयत्न सुरू आहे. कालचे विधान हा त्याचाच एक भाग आहे. कोविडच्या काळात आम्ही विकासाची अनेक कामे केली. अनेक निर्णय घेतले. विकासही सुरू ठेवला आणि कोरोनाची परिस्थितीही नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. माझ्या खात्याने अनेक कामे केली. मला स्वातंत्र्य नसते तर मी ही कामे करू शकलो असतो काय?, असा सवाल देखील त्यांनी केला आहे.
काय म्हणाले नारायण राणे?
नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन मीडियाशी संवाद साधला. यावेळी राणेंनी हा मोठा दावा केला आहे. एकनाथ शिंदे मंत्री असले तरी सहीपुरते आहेत. मातोश्रीशिवाय ते एकही सही करू शकत नाहीत, ते कंटाळले आहेत. आमच्याकडे आले तर घेऊ, असे सांगतानाच आम्ही मनात आणले तर लवकरच सरकारचे विसर्जन करू, असा दावाही त्यांनी केला. यावेळी त्यांनी शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हेंवरही प्रतिक्रिया व्यक्त केली. नीलम गोऱ्हे यांना मी शिवसेनेत आणले. माझ्यावर टीका केली की मंत्रीपद मिळते, असा टोलाही त्यांनी लगावला. मुंबई असो वा वसई-विरार. आमच्या हाती सत्ता द्या. आम्ही विकास करुन दाखवू, असेही ते म्हणाले.
(हेही वाचाः परबांनू आता सांभाळून रवा…)
Join Our WhatsApp Community