नॉट रिचेबल असलेले ‘शिवसेने’चे नेते एकनाथ शिंदे ‘भाजपा’त होणार सामील?

राज्याच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शिवसेनेचे सर्वात वरिष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह काही आमदार विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर रातोरात नॉटरिचेबल आहेत. मात्र नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, नॉट रिचेबल असलेले एकनाथ शिंदे हे गुजरातच्या सूरतमधील मेरिडियन हॉटेलमध्ये असल्याचे सांगितले जात आहे. गुजरात – सूरत हा भाजपाचा बालेकिल्ला मानला जात असून या ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्यासह हे सर्व आमदार मुक्कामी आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे भाजपाच्या संपर्कात असल्याची देखील चर्चा होत आहे.

(हेही वाचा – शिवसेनेला ‘पक्ष फुटी’ची भीती? ‘वर्षा’वर बोलावलेल्या तातडीच्या बैठकीला अनेक आमदार गैरहजर)

एकनाथ शिंदेंसह ११ आमदार शिवसेनेवर नाराज

असेही सांगितले जात आहे की, सोमवारी रात्री एकनाथ शिंदेंसह ११ आमदार सूरतच्या या हॉटेलमध्ये आले आहेत. यावेळी त्यांनी गुजरातच्या एका वरिष्ठ नेत्यासह गुप्त बैठकही केली. तसेच, या हॉटेल बाहेर सुरक्षा पोलीस तैनात करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह हे ११ आमदार शिवसेनेवर नाराज आहेत. त्यामुळे ते नॉट रिचेबल होऊन थेट गुजरातला दाखल झाले आहे.  दरम्यान, या हॉटेलमध्ये येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांची चौकशी केली जात आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर महाविकास आघाडीतील धुसफूस बाहेर येऊ लागली आहे. भाजप पाचही जागा जिकल्यानंतर सत्ताधाऱ्यांमध्ये ब्लेमगेमला सुरुवात झाली आहे. राज्यसभेला भाजपा १२३ मते मिळाली होती. मात्र विधानपरिषदेला १३३ मते मिळाल्याने काँग्रेस आणि शिवसेनेची मते फुटल्याचे समोर आले आहे. तर महाविकास आघाडीची एकूण २१ मते आणि शिवसेनेच्या गोटातील १० मतांचा सौदा झाल्याची चर्चा देखील होत आहे.

शिवसेनेच्या गोटात भीतीचे वातावरण

विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपने पुन्हा एकदा चमत्कार करून दाखवत महाविकास आघाडीला अस्मान दाखवल्यानंतर मध्य रात्री शिवसेनेच्या सर्व आमदारांची तातडीची बैठक वर्षा निवासस्थानी बोलावण्यात आली होती. या निवडणुकीत शिवसेनेची १२ ते १३ मते फुटल्याची शक्यता असल्याने ही बैठक बोलावण्यात आली होती. मात्र, तातडीने बोललेल्या या बैठकीत शिवसेनेच्या जेष्ठ नेत्यांसह मंत्री असलेले आमदारही गैरहजर राहिले होते, अशी माहिती मिळत आहे. या बैठकीसाठी अनेक आमदारांशी पक्षाने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचे फोन बंद किंवा नॉट रिचेबल असल्याने शिवसेनेच्या गोटात भीतीचे वातावरण पसरले होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here