आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक, एकनाथ शिंदेंच्या ट्विटचा अर्थ काय?

111

महाराष्ट्राच्या राजकीय नाट्यात शिवसेना वरिष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी ट्विट केले आहे. या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली असून एकच खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष लागून असताना त्यांनी पहिले ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नसल्याचे स्पष्ट म्हटले आहे. मात्र या ट्विटमध्ये दिलेल्या संदेशाचा नेमका अर्थ काय? असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे.

काय आहे शिंदेंचं ट्विट

शिवसेना या पक्षात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात बंड झाल्याचे समोर आले आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आता राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या स्थिरतेबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. अशातच एकनाथ शिंदेंच्या ट्विटने चर्चा सुरू केली आहे. आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत… बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही, असे एकनाथ शिंदेंनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

उद्धव ठाकरेंच्या नावाचा उल्लेख नाही

एकनाथ शिंदे यांनी आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेच्या नेतृत्वाचं नावं घेतले. मात्र उद्धव ठाकरे म्हणजे शिवसेनेचे सध्याचं नेतृत्व असणाऱ्या नावाचा उल्लेखही एकनाथ शिंदे यांच्या ट्विटमध्ये नसल्याने चर्चांना उधाण आले आहे. तर दुसरीकडे शिवसेनेने एकनाथ शिंदे यांना विधानसभेच्या गटनेते पदावरून हटवले असून त्यांच्या जागी अजय चौधरी यांची नेमणूक करण्यात आल्याची माहिती मिळतेय.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.