शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थकांचा गट हा नाराज असल्यामुळे शिवसेनेला मोठे भगदाड पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे शिवसेनेसाठी हा मोठा भूकंप आहे. एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्यासाठी शिवसेनेकडून एकीकडे प्रयत्न करण्यात येत आहेत, तर दुसरीकडे त्यांच्या विरोधात निदर्शने करण्यात येत आहेत.
असे होत असतानाच आता शिवसेनेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी एकनाथ शिंदे यांना भावनिक आवाहन केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाला भेट दिली, त्यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले.
(हेही वाचाः हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन शिवसेनेत दुसरे बंड, 48 वर्षांपूर्वीच्या इतिहासाची पुनरावृत्ती)
बाळासाहेबांनाही वेदना होत आहेत
एकनाथ खडसे यांच्यासोबत किती आमदार आहेत याच्याशी आम्हाला घेणं-देणं नाही. त्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सक्षम आहेत. आज बाळासाहेब यांच्या स्मृतिस्थळावरील दिवा सुद्धा हलताना दिसतोय. याचा अर्थ बाळासाहेबांनाही वेदना होत आहेत, अशा शब्दांत किशोरी पेडणेकर यांनी आपलं दुःख व्यक्त केलं.
आजचा दुःखाचा प्रसंग
बाळासाहेब असताना सुद्धा जे शिवसैनिक बाहेर पडले, त्यांनी देखील शिवसेनेवर अनेक आरोप केले. त्यामुळे एकनाथ शिंदे यांची नाराजी देखील क्लेशदायक आहे. आम्ही प्रत्येक गोष्ट स्मृतिस्थळावर येऊन बाळासाहेबांच्या चरणी व्यक्त करतो. आजचा प्रसंग हा दुःखाचा आहे, त्यामुळे असं प्रसंग पुन्हा पुन्हा पहायला लागू नयेत, हे मागणं आज बाळासाहेबांच्या चरणी आम्ही मांडलं असल्याचे किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.
(हेही वाचाः 21 जून वर्षातला मोठा दिवस की ‘वर्षा’तला शेवटचा दिवस?, मनसेची मुख्यमंत्र्यांवर खोचक टीका)
एकनाथ शिंदे यांना आवाहन
एकनाथ शिंदे यांना काही सांगण्याएवढी मी मोठी नाही. पण एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून त्यांना मी विनंती करेन, भाजपच्या या आमिषाला बळी पडू नका. आपल्या घरी परत या, असे भावनिक आवाहन किशोरी पेडणेकर यांनी एकनाथ शिंदे यांना केले आहे. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले.