विधान परिषद निकालानंतर महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का बसला आहे. या शिवसेनेतील नाराजी आता उघड झाली आहे. या निकालानंतर शिवसेनेची वरिष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह काही आमदार नॉट रिचेबल झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, शिवसेनेच्या काही आमदारांशी आणि एकनाथ शिंदेंशी कोणताही संपर्क होऊ शकत नसताना आता शिवसेनेचे दोन शिलेदार आणि अन्य काही शिवसैनिकांच्या मनधरणीसाठी सूरतला रवाना झाले आहेत.
(हेही वाचा – नॉट रिचेबल झाल्यानंतर शिदेंची पहिली FB पोस्ट, म्हणाले, “… आणि समृद्ध जीवनाचा राजमार्ग”)
मिळालेल्या माहितीनुसार, सूरतमधील मेरिडियन हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे आहेत. या हॉटेलबाहेर गुजरात पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सूरत हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. अशातच विधान परिषदेचा निकाल लागल्यानंतर एकनाथ शिंदे आणि काही सेना आमदारांमध्ये नाराजी पाहायला मिळाली. दरम्यान, त्यांची मनधरणी करण्यासाठी उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक तसेच शिवसेनेचे नेते मिलिंद नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांना फोन केला असून त्यांच्यात १० मिनिटे बोलणे झाले. तर एकनाथ शिंदेंनी चर्चेची तयारी दाखविली आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणं झाल्यानंतर मिलिंद नार्वेकर आणि ठाण्यातील विधान परिषदेचे आमदार, शिंदेंचे अतिशय विश्वासू आणि मर्जीतले रविंद्र फाटक हे दोघे सेनेचे शिलेदार सूरतच्या दिशेने रवाना झाले आहेत. या दोघांची एकनाथ शिंदेशी भेट होताच त्यांच्या चर्चा झाल्यानंतर त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर तेथूनच मुख्यमंत्र्यांना फोन करून शिंदे यांचे म्हणणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कानावर घालणार असल्याचे सांगितले जात आहे.