मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उठाव केल्यानंतर शिवसेनेतील अनेक जुने-जाणते नेते सुद्धा शिंदे गटात सहभागी झाले आहेत. बाळासाहेबांचे कडवे शिवसैनिक म्हणून ओळख असलेल्या माजी मंत्री रामदास कदम हे देखील शिंदे गटात सहभागी झाले आहेत. त्यांनी आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. शिवबंधन बांधा आणि घरी बसा असा संदेश मला देण्यात आल्याचा आरोप रामदास कदम यांनी केला आहे.
राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न
शिवसेनेत मला देखील शिवबंधन बांधण्यात आले होते. पण शिवबंधन बांधून मला आयुष्यभरासाठी राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. शिवबंधन बांधा आणि घरी बसा असाच संदेश मला देण्यात आला असल्याचा खळबळजनक आरोप रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर केला आहे.
(हेही वाचाः पवारांचा पाठिंबा तर पाटलांचा विरोध, विरोधी पक्षनेतेपदवरुन राष्ट्रवादीत दुमत)
मंत्रीपदासाठी शिंदे गटात आलो नाही
मी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणार सच्चा शिवसैनिक आहे. बाळासाहेबांचे विचार जिवंत ठेवण्यासाठीच मी शिंदे गटात सहभागी झालो आहे. रामदास कदमने आयुष्यात कधीही कोणाचा विश्वासघात केला नाही. मलाच नाही तर माझ्या मुलाला देखील राजकारणापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला. रामदास कदम हे कुठल्याही मंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले नाहीत. तर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी मी शिंदे गटात आलो आहे, अशी प्रतिक्रिया रामदास कदम यांनी दिली आहे.
Join Our WhatsApp Community