राजकीय निवडणुकीपूर्वी उमेदवाराची गुन्हेगारी पार्श्वभूमी तसेच त्यांची सद्यस्थिती जाहीर करणे बंधनकारक आहे. परंतु वृत्तपत्रात जाहिरात देऊन जाहीर करावी हे बंधनकारक नाही. मात्र शिवसेनेने राज्यसभेच्या रिंगणात असलेल्या आपल्या दोन उमेदवाराची गुन्हेगारी पार्श्वभूमी एका मराठी दैनिकात जाहिरातीच्या माध्यमातून जाहीर केली आहे. वृत्तपत्रातून उमेदवाराची अशी माहिती जाहीर करण्यामागचे कारण काय याची आता चर्चा होऊ लागली आहे.
गुन्ह्याची माहिती आयोगाला देणे बंधनकारक
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात राजकीय निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या प्रत्येक उमेदवारावरील दाखल गुन्ह्याची माहिती निवडणूक आयोगाला देणे बंधनकारक आहे. न्यायालयाच्या निकालानंतर प्रत्येक उमेदवार स्वतःची गुन्हेगारी पार्श्वभूमी प्रतिज्ञापत्रद्वारे जाहीर करीत असतो. परंतु वृत्तपत्रात जाहिरात देऊन ही माहिती जाहीर करणे बंधनकारक नसताना राज्यसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात असलेले शिवसेना नेते संजय राऊत आणि संजय पवार यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्याची सखोल माहिती तसेच त्याची सद्यस्थिती काय आहे याची माहिती एका मराठी दैनिकातून जाहिराती स्वरूपात जाहीर करण्यात आले आहे.
(हेही वाचा – 69 Loan App Banned: कर्ज वसुलीसाठी छळ, महाराष्ट्र सरकारकडून Google ला नोटीस)
यामुळे राजकीय चर्चेला आले उधाण
तब्बल दीड पानांची जाहिरात देऊन ही माहिती शिवसेनेकडून देण्यात आली आहे. या जाहिरातीत दिलेल्या माहितीनुसार संजय राऊत यांच्याविरुद्ध राज्यभरात २९ गुन्हे दाखल आहेत. हे सर्व गुन्हे मानहानीचे गुन्हे असून त्यापैकी २१ गुन्हे न्यायालयात प्रलंबित असून उर्वरित ८ गुन्ह्ये निकाली निघाले आहेत. प्रलंबित गुन्ह्यापैकी बऱ्याच गुन्ह्यात अद्याप दोषारोप देखील न्यायालयात दाखल करण्यात आलेले नाही. दरम्यान संजय मारुतीराव पवार हे शिवसेनेचे राज्यसभेचे दुसरे उमेदवार असून त्यांच्यावर कोल्हापुरमध्ये १० गुन्हे दाखल आहेत, हे सर्व गुन्हे फौजदारी स्वरूपाचे असून सर्व गुन्हे न्यायालयात प्रलंबित आहेत.
Join Our WhatsApp Community