गेल्या काही महिन्यांमध्ये अधिकाऱ्यांच्या होणाऱ्या बदल्या हा राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय झाला असून, आता या बदल्यांवरून राज्यातील राजकारण तापू लागले आहे. त्यातच बुधवारी ४५ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यावरून तर शिवसेना-भाजपा आमने सामने आले आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आरोप शिवसेनेच्या चांगलाच जिव्हारी लागला असून, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावर उत्तर दिले आहे.
बदल्या महाराष्ट्राच्या हिताच्या
बदल्या या महाराष्ट्र राज्याच्या हिताच्या’, असल्याचे म्हणत विरोधकांना संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे. ‘नवीन सरकार आल्यानंतर बदल्या करु नये, असे घटनेत लिहिले आहे का? बदल्या करु नका असे कोणत्या कायद्याच्या पुस्तकात लिहिले आहे. तुमच्या लोकांनाच वर्षानुवर्ष ठेवून राज्य करावे का? बदल्या काय फक्त आम्हीच केल्या का? बदल्या करुन आम्ही काय नवीन चमत्कार केला आहे का? मनमोहन सिंग यांचे सरकार जाऊन मोदींचे सरकार आले तेव्हा बदल्या केल्या नाहीत का? बदल्या राज्याच्या हिताच्या आहेत आणि तो करण्याचा अधिकार लोकनियुक्त सरकारला आहे असे संजय राऊत यावेळी म्हणालेत.
फडणवीस यांची सरकावर टीका
दरम्यान बुधवारी मोठ्या प्रमाणात झालेल्या बदल्यांवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीं राज्यातील ठाकरे सरकार केवळ बदल्या करण्यात व्यस्त असल्याची टीका केली होती. तसेच कोरोनाबाबत सरकार गंभीर नाही, असा हल्लाबोल देखील त्यांनी केला होता. बदल्या केल्या नसत्या तरी चालले असते. सर्व मंत्री, प्रशासन बदल्यांमध्ये गुंतले आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली आहे.
राज्यातील या महत्त्वाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या
- विश्वास नांगरे पाटील सह आयुक्त कायदा – व सुव्यवस्था मुंबई
- बिपीन सिंग , नवी मुंबई पोलीस आयुक्त
- डॉ आरती , पोलीस आयुक्त अमरावती
- मनोज लोहिया , आयजीपी कोल्हापूर क्षेत्र
- रंजित सेठ महासंचालक , लाचलुचपत विभाग
- प्रताप दिघावकर , आयजीपी , नाशिक क्षेत्र
- कृष्ण प्रकाश , पोलीस आयुक्त , पिंपरी चिंचवड
- दीपक पांडे , नाशिक पोलीस आयुक्त
- जगजीत सिंह , अतिरिक्त पोलीस महासंचालक , लाचलुचपत विभाग