छापेमारी देशमुखांकडे, पण चिंता वाढली शिवसेना नेत्यांची

अनिल देशमुखांनंतर आपला तर नंबर लागणार नाही ना, याची चिंता आता ईडीच्या रडारवर असलेल्या शिवसेनेच्या नेत्यांना वाटू लागली आहे.

85

माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे सध्या ईडीच्या रडारवर असून, त्यांच्या निवासस्थानी इडीने धाड टाकल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. मात्र एकीकडे अनिल देशमुख यांच्या घरावर ईडीने टाकलेल्या धाडीमुळे ठाकरे सराकर अडचणीत आले असतानाच, आता शिवसेनेच्या नेत्यांची देखील धाकधुक वाढली आहे. सचिन वाझे यांनी आपल्या पत्रात परिवहन मंत्री अनिल परब यांचा देखील उल्लेख केल्यामुळे आधीच ते अडचणीत आहेत. त्याचमुळे अनिल देशमुखांनंतर आपला तर नंबर लागणार नाही ना, याची चिंता आता ईडीच्या रडारवर असलेल्या शिवसेनेच्या नेत्यांना वाटू लागली आहे.

शिवसेनेचे हे नेते ईडीच्या रडावर

पीएमसी बँकेतील कथित घोटाळ्याप्रकरणी काही महिन्यांपूर्वी ईडीने संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना नोटीस बजावली होती. त्यानंतर संजय राऊत यांनी लागलीच पत्रकार परिषद घेत थेट विरोधकांना राजकीयदृष्ट्या संपवता येत नसल्याने ईडी, सीबीआयसारख्या यंत्रणांचा वापर केला जात असल्याचे म्हटले होते. मात्र, आता राज्यात पुन्हा ईडी सक्रीय झाल्याने पुन्हा एकदा त्यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. एवढेच नाही तर संजय राऊत यांनी नुकतीच उद्धव ठाकरे यांची भेट देखील घेतली आहे. तर दुसरीकडे परिवहन मंत्री अनिल परब, तसेच आधीपासून ईडीच्या रडारवर असलेले प्रताप सरनाईक हे देखील सध्या ईडीच्या कारवाईमुळे चिंतेत असल्याची माहिती मिळत आहे. भविष्यात आणखी काही शिवसेनेचे नेते ईडीच्या रडारवर येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

(हेही वाचाः ईडीने न्यायालयात सांगितला वाझे-देशमुखांचा १०० कोटी वसुलीचा मार्ग !)

सरनाईकांंनी मांडली व्यथा

केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर असलेल्या प्रताप सरनाईक यांनी मुख्यमत्र्यांना पत्र लिहित आपली हतबलता बोलून दाखवली होती. आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जुळवून घेतलेले बरे, असे माझे वैयक्तिक मत आहे. निदान यामुळे प्रताप सरनाईक, अनिल परब, रवींद्र वायकर या आपल्या सहकाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना होणारा नाहक त्रास तरी थांबेल, अशी अनेक कार्यकर्त्यांची भावना असल्याचे सरनाईक यांनी आपल्या पत्रात म्हटले होते.

नाहक त्रास थांबेल

कोणताही गुन्हा किंवा चूक नसताना केंद्रीय तपास यंत्रणांकडून आम्हाला नाहक त्रास दिला जात आहे. केंद्रीय तपास यंत्रणेचा दलाल व शिवसेनेमुळे माजी खासदार झालेल्या नेत्यांकडून जी बदनामी सुरू आहे त्यालाही कुठे तरी आळा बसेल. आम्हाला टार्गेट करत असताना, आमच्या कुटुंबियांवर सुध्दा सतत आघात होत आहेत, खोटे आरोप होत आहेत. एका केसमधून जामीन मिळाला की तात्काळ जाणीवपूर्वक दुसऱ्या केसमध्ये गुंतवणे, त्यातून बाहेर आलो की तिसऱ्या केसमध्ये गुंतवणे अशा प्रकारचे जाणीवपूर्वक काम या तपास यंत्रणा करत आहेत. आपल्या एका निर्णयामुळे हे कुठेतरी थांबेल, असे सरनाईक आपल्या पत्रात म्हणाले होते.

(हेही वाचाः अजित पवार, अनिल परब यांचीही सीबीआय चौकशी करा! भाजपची मागणी)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.