परबांना आलेल्या नोटीसचा शिवसेना नेत्यांनी घेतला धसका

अनिल परब आणि भावना गवळी यांना आलेल्या नोटीसबद्दल न बोललेलं बरं, असं म्हणत शिवसेना नेत्यांनी मौन बाळगले आहे.

171

परिवहन मंत्री अनिल परब आणि शिवसेनेच्या खासदार भावना गवळी या सध्या ईडीच्या रडारवर असताना शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली आहे. शिवसेनेचे इतर नेते देखील सध्या चिंतेत असून अनिल परब यांना आलेल्या ईडीच्या नोटीसवर साधी प्रतिक्रिया देताना देखील शिवसेनेचे काही नेते घाबरत आहेत. अभिनेत्री कंगना राणावतवर टीका करणाऱ्या प्रताप सरनाईक यांना दणका बसल्यानंतर आता शिवसेनेचे इतर नेते सावध झाले असून, अनिल परब आणि भावना गवळी यांना आलेल्या नोटीसबद्दल न बोललेलं बरं, असं म्हणत शिवसेना नेत्यांनी मौन बाळगले आहे.

एखादी प्रतिक्रिया द्यायची आणि त्याचे नंतर भलतेच परिणाम भोगावे लागायचे त्यापेक्षा न बोललेले बरे असे काही नेत्यांनी खासगीत बोलताना सांगितले. त्यामुळे एकीकडे भावना गवळी, अनिल परब ईडीच्या रडारवर असले तरी धसका मात्र शिवसेनेच्या इतर नेत्यांनी घेतला आहे.

(हेही वाचाः ईडीमुळे ठाकरे सरकारला हुडहुडी… आणखी एक मंत्री अडकणार?)

आतापर्यंत हे नेते ईडीच्या रडारवर

भावना गवळी

यवतमाळ वाशिमच्या शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या पाच शिक्षण संस्थांवर सोमवारी ईडीने छापेमारी सुरू केली. या कारवाईनंतर खासदार भावना गवळी यांनी भाजपावर टीकास्त्र सोडले. ईडीकडून या ठिकाणी कागदपत्रांची पडताळणी करण्यात येत आहे. भाजपा नेते किरीट सोमय्यांच्या आरोपानंतर ईडीचं पथक जिल्ह्यात दाखल झालं आहे.

प्रताप सरनाईक 

24 नोव्हेंबर 2020 रोजी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक, त्यांचे पुत्र विहंग सरनाईक आणि पुर्वेश सरनाईक यांच्या घरावर ईडीने छापे मारले. त्यानंतर विहंग सरनाईक यांची ईडीने 5 तास चौकशी केली.

(हेही वाचाः ईडी भाजपा चालवते कि भाजपा ईडीला चालवते? )

संजय राऊत

पीएमसी बँकेतील कथित घोटाळ्याच्या चौकशीसाठी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना 29 डिसेंबर रोजी ईडीसमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर वर्षा राऊत यांनी 5 जानेवारीपर्यंत मुदतवाढ मागितली होती. वर्षा राऊत यांना PMC बँकेतील खात्याशी संबंधित कागदपत्रं घेऊन कार्यालयात येण्यास सांगितले होते. संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधवी राऊत आणि वर्षा राऊत यांच्यात झालेले आर्थिक व्यवहार ईडीच्या रडारवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली. विशेष म्हणजे प्रवीण राऊत यांना काही दिवसांपूर्वी ईडीने अटक केली होती, मात्र त्यांची जामिनावर सुटका झाली.

(हेही वाचाः मंत्री अनिल परबांची पदोन्नती भ्रष्टाचार प्रकरणी चौकशी! कुणी दिले आदेश?)

परबांना हवा अवधी

ईडीकडून परिवहन मंत्री अनिल परब यांना रविवारी नोटीस पाठवून मंगळवार 31 ऑगस्ट रोजी ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे सांगण्यात आले होते. यावर अनिल परब यांनी ईडीला एक पत्र पाठवून मंगळवारी चौकशीसाठी उपस्थित राहू शकणार नसल्याचे कळवले आहे. मंत्री असल्यामुळे कार्यक्रम अगोदरच ठरले आहेत, ते रद्द करता येणार नाहीत. त्यामुळे मला 14 दिवसांचा अवधी देण्यात यावा, असं परब यांनी पत्रात म्हटले आहे. ईडीनेही परब यांचे पत्र स्वीकारले आहे.

(हेही वाचाः ईडीच्या कार्यालयात भाजपचा पदाधिकारी डेस्क अधिकारी! संजय राऊतांचा आरोप)

सोमय्यांच्या यादीत शिवसेनेच्या या नेत्यांचा समावेश

किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारशी संबंधित 11 जणांवर घोटाळ्याचा आरोप केला आहे. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यापासून ते मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यापर्यंत अनेकांवर त्यांनी आरोप केले आहेत. यामध्ये शिवसेना आमदार प्रताप सरनाईक, रवींद्र वायकर, शिवसेना आमदार यामिनी जाधव यांचाही समावेश आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.