राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार हा मंगळवारी पार पडणार आहे. त्यामुळे आता राज्याच्या विधान परिषद विरोधी पक्षनेते पदासाठी सुद्धा विरोधकांकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांनी विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर दावा सांगितला आहे.
पण शिवसेनेचे विधान परिषद आमदार अंबादास दानवे यांच्याकडे विरोधी पक्षनेते पदाची धुरा सोपवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून विधान परिषद सचिवांना याबाबत पत्र देण्यात आले आहे.
(हेही वाचाः अखेर ठरलंच! मंत्रिमंडळ विस्ताराच्या तारखेवर शिक्कामोर्तब)
काँग्रेस-राष्ट्रवादीची भूमिका काय?
राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद हे रिक्त झाले आहे. त्यामुळे पावसाळी अधिवेशनापूर्वी विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्यांची निवड होणे गरजेचे आहे. त्यामुळेच आता विरोधकांकडून हालचालींना वेग आला आहे. शिवसेनेने जरी दानवे यांच्या नावाची विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी शिफारस केली असली, तरी शिवसेना आमदारांचे संख्याबळ पाहता काँग्रेस आणि राष्ट्रवादी याबबात काय भूमिका घेतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
(हेही वाचाः ‘ही दोस्ती तुटायची नाय…’ रश्मी ठाकरेंना मिसेस फडणवीसांचे आश्वासन)
शिवसेना-काँग्रेसला अपेक्षा
महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर दावा सांगण्यात येत आहे. दरम्यान, विधान सभेतील संख्याबळानुसार विधान सभेचे विरोधी पक्षनेते पद राष्ट्रवादीला देण्यात आले आहे. त्यामुळे काँग्रेस आणि शिवसेनेला विधान परिषद विरोधी पक्षनेते पदाची अपेक्षा आहे.
Join Our WhatsApp Community