शिंदे गट आणि भाजपाने विधानसभेत बहुमत सिद्ध केल्यानंतर प्रथमच विधिमंडळ आवारात आदित्य ठाकरे आणि शिंदे गटातील आमदार प्रकाश सुर्वे समोरासमोर आले. त्यावेळी आदित्य ठाकरेंनी ‘मतदार संघात जाऊन काय सांगणार, बघा आता काय करायचे’, अशा शब्दांत सुनावले, तेव्हा चेहरा पडलेले सुर्वे काही बोलू शकले नाहीत, मात्र जेव्हा मागाठाणे मतदारसंघात परतले तेव्हा त्यांच्या मिरवणुकीत शेकडो शिवसैनिकांनी सहभाग घेऊन त्यांना पाठिंबा दिल्याचे दिसले, तसेच शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनीही राजीनामे दिले.
पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे
मुंबईत शिवसेनेचे चार आमदार शिंदे गटात गेल्यानंतरही आतापर्यंत संघटनात्मक पातळीवर कुणीही राजीनामे दिले नव्हते, परंतु आमदार प्रकाश सुर्वे यांच्या समर्थनार्थ त्यांच्या मतदारसंघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्यास सुरुवात केली आहे. मागाठाणेतील दोन शाखाप्रमुख आणि तीन महिला शाखा संघटकांचे पदाचे राजीनामा दिले आहेत. शाखा क्रमांक 3चे शाखाप्रमुख प्रकाश पुजारी आणि महिला संघटक सुषमा पुजारी, शाखा क्रमांक 12 चे शाखाप्रमुख कौस्तुभ म्हामूणकर, शाखा क्रमांक 26 च्या महिला शाखा संघटक हेमलता नायडू, शाखा क्रमांक 5च्या महिला शाखा संघटक विद्या पोतदार यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. आमदार प्रकाश सुर्वे यानी मतदारसंघात शक्तीप्रदर्शन केले. तत्पूर्वी मतदारसंघातील शिवसेना पदाधिका-यांनी राजीनामा देत सुर्वे यांचे समर्थन केले.
(हेही वाचा शिंदे गटातील आमदार सदा सरवणकर ‘शिवतीर्था’वर राज ठाकरेंच्या भेटीला!)
आदित्य ठाकरेंसमोर निःशब्द झालेले सुर्वे
शिंदे गटातील आमदार डोळ्यात डोळे घालू बोलू शकणार नाहीत, असे शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते. विधानमंडळ परिसरात आमदार प्रकाश सुर्वे आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे समोरासमोर आले. दोघांनीही हस्तांदोलन केले. दोघांची भेट आणि संभाषण कॅमेऱ्यात कैद झाली. मात्र या संभाषणात प्रकाश सुर्वे काहीही बोलू शकले नव्हते. आदित्य ठाकरे समोर आल्यानंतर काहीशी चिंता प्रकाश सुर्वे यांच्या चेहऱ्यावर दिसली. प्रकाश सुर्वे समोर येताच आदित्य ठाकरे यांनी म्हटले होते की, एवढे जवळचे असून असे कराल, असे वाटले नव्हते. काय सांगाल मतदारसंघात? त्यादिवशी जेवण तयार ठेवले होते, आम्ही तुमच्याकडे येत होतो. असे कराल खरंच अपेक्षित नव्हते. माझं तुमच्यावर खरोखर प्रेम होतं. हे तुम्हाला पण माहीत आहे. पण बघा आता विचार करा. पण मला स्वत:ला दु:ख झाले. त्यावेळी प्रकाश सुर्वे काहीही न बोलता निघाले. त्यांचा चेहरा पडलेला दिसून आला होता.
Join Our WhatsApp Community