शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार मंगळवारी पार पडल्यानंतर आता विरोधकांकडूनही हालचालींना वेग आला आहे. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी आता शिवसेना आमदार अंबादास दानवे यांची निवड करण्यात आली आहे. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गो-हे यांनी दानवे यांना निवडीचे पत्र दिले आहे. त्यामुळे आगामी अधिवेशनात विधान परिषदेत सत्ताधारी शिंदे गट आणि शिवसेना आमनेसामने पहायला मिळणार आहेत.
दानवेंच्या नावावर शिक्कामोर्तब
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर विधान सभेचे विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांना देण्यात आले. त्यानंतर विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी कोणाची वर्णी लागणार याची चर्चा होती. महाविकास आघाडीतील काँग्रेस देखील या पदासाठी इच्छुक असल्याचे बोलले जात होते. पण सोमवारी शिवसेनेकडून अंबादास दानवे यांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती. त्यानंतर आता विधान परिषदेच्या उपाध्यक्षा नीलम गो-हे यांनी अंबादास दानवे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.
कोण आहेत अंबादास दानवे?
अंबादास दानवे हे शिवसेनेचे औरंगाबाद येथील नेते आहेत. 2019 मध्ये ते विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून निवडून आले. त्याआधी 2000 साली ते औरंगाबाद महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले, त्यानंतर 2011 साली त्यांची शिवसेना औरंगाबाद जिल्हा प्रमुख म्हणून निवडून करण्यात आली होती.
Join Our WhatsApp Community