भास्कर जाधव… शिवसेनेचे आमदार आणि कोकणातले रावडी नेते अशी त्यांची ओळख. भास्करराव नेहमीच चर्चेत असतात. कधी विधानसभेतील आमदारांच्या निलंबनावरुन, तर कधी मंत्रीपद न मिळाल्याच्या नाराजीवरुन. भास्कर रावांची नेहमीच राज्याच्या राजकारणात चर्चा असते. आता देखील पुन्हा ते एकदा चर्चेत आले आहेत आणि विरोधकांच्या टिकेचे धनी झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चिपळूण दौऱ्यावर असताना भास्कर जाधवांचा अरेरावीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि भास्करराव नेहमीप्रमाणे चर्चेत आले.
आधीच भाजपच्या १२ आमदरांचे निलंबन करुन विरोधकांच्या रडारवर असलेल्या भास्कर रावांच्या या व्हिडिओचा मात्र, विरोधकांनी चांगलाच वापर करत जोरदार हल्ला चढवला. पण अशी चर्चेत येण्याची ही भास्कर रावांची पहिलीच वेळ नाही. याआधीही ते चर्चेत आले होते. भास्कर जाधव नेमके किती वेळा आणि कसे चर्चेत आले, याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट…
(हेही वाचाः भास्कर जाधवांच्या गैरवर्तनाची सेनेने गंभीर दखल घ्यावी! देवेंद्र फडणवीसांची सूचना )
चिपळूणच्या व्हिडिओने भास्करराव ट्रोल
मुसळधार पावसामुळे कोकणात पूरस्थिती निर्माण झाली असून, कोकणात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकणात जाऊन पहाणी केली. मात्र मुख्यमंत्र्यांच्या या पाहणी दौऱ्याची चर्चा कमी आणि भास्कर रावांची चर्चाच सर्वाधिक झाली. मुख्यमंत्र्यांच्या चिपळूण दौऱ्यात भास्कर जाधव यांनी मदत मागणाऱ्या महिलेसोबत केलेली अरेरावी याचे मुख्य कारण आहे. आम्हाला मदत करा, हवे तर आमदारांचा एक दोन महिन्यांचा पगार देऊ नका, अशी विनंती करणाऱ्या महिलेसोबत भास्कर जाधव यांनी अरेरावी केली. आमदारांचा सहा महिन्यांचा पगार दिला नाही तरी काही फरक पडत नाही, असं सांगत त्यांनी महिलेच्या मुलाला ‘आईला समजाव’, असं सांगतानाचा त्यांचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. भास्कर जाधव विरोधकांच्या टिकेचे धनी बनले.
(हेही वाचाः जे वेटिंगवर आहेत, ते वेटिंगवरच राहतील! राणेंच्या ‘त्या’ विधानाला पवारांचे चोख उत्तर)
काय आहे महिलेची प्रतिक्रिया
मात्र, त्यानंतर संपूर्ण वादावर महिलेने प्रतिक्रिया दिली आहे. स्वाती भोजने असं या महिलेचं नाव आहे. स्वाती यांनी भास्कर जाधव यांची बाजू घेताना ते उद्धटपणे बोलले नाहीत असे म्हटले आहे. “अजूनही आमच्याकडे लाईट नाही, मोबाईल चार्ज नाही, त्यामुळे सोशल मीडियावर नेमका काय प्रचार सुरू आहे, हे मी पाहिलेलं नाही. पण ते उद्धटपणे बोलले नाहीत. वडिलकीच्या नात्याने बोलले आहेत,” असे स्वाती यांनी सांगितले. त्यांचे आणि आमचे चांगले संबंध आहेत, असंही यावेळी त्यांनी म्हटले. त्यांचा आवाजच रावडी राठोडसारखा असल्याने गैरसमज होतो. त्यांचं बोलणं कठोर आहे, त्यामुळे चुकीचा अर्थ काढण्याची गरज नाही. माझ्या मुलाला आईची काळजी घे नंतर येऊन भेटतो, असं ते म्हणाले. प्रत्येकवेळी ते मदत करतात, येऊन भेटतात. माझ्यावर कोणताही दबाव नाही. दबाव असता तर आमदार, खासदारांचा पगार काढला नसता. त्यांच्याबद्दल वाईट बोलण्याचं काही कारण नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.
(हेही पहाः सामंतांना मारा गोळी!)
दारू विकली तर काय बिघडले?
लोकांनी पोटापाण्यासाठी दारू विकली तर काय बिघडले, पोलिसही हप्ते घेतातच ना!, असे वादग्रस्त विधान शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी लॉकडाऊनच्या काळात केले होते. भास्कर जाधव यांनी आपल्या गुहागर मतदरासंघातील एका राजकीय कार्यक्रमात बोलताना हे वक्तव्य केले होते. अवैध दारुविक्रीसाठी कारवाई झालेल्या एका शिवसेना पदाधिकाऱ्याची त्यांनी पाठराखण केली. पोटापाण्यासाठी दारू विकली तर काय झालं? तुम्ही पोलिस हप्ते घेत नाही का?, असे म्हणत मी तुमच्या पाठीशी आहे, असे भास्कर जाधव यांनी जाहीरपणे सांगितले होते. तसेच फक्त दोन गोष्टींसाठी मला फोन करू नका, मुलींची छेडछाड आणि चोरी. बाकी कोणत्याही गोष्टीला तुम्ही घाबरू नका, भास्कर जाधव तुमच्या पाठीशी असल्याचेही त्यांनी म्हटले होते.
(हेही वाचाः सरकारला उशिरा सुचले शहाणपण! पुराचा इशारा देणारी यंत्रणा करणार कार्यान्वित)
मंदिरात शिवीगाळ
भास्कर जाधव यांचा रत्नागिरीतील ग्रामदैवतेच्या मंदिरात संयम सुटल्याचे काही महिन्यांपूर्वी समोर आले होते. त्यांनी शारदादेवीच्या मंदिरात जोरदार गोंधळ घालत एका वयोवृद्ध माणसाला शिवीगाळ केली. तसेच त्याला मारहाण केल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. हा सर्व प्रकार शारदा देवी मंदिर ट्रस्टच्या पदाधिकारी आणि ग्रामस्थ समिती यांच्या बैठकीदरम्यान झाला होता. भास्कर जाधव यांचे मूळ गाव चिपळूण तालुक्यातील तुरंबव हे आहे. या ठिकाणी शारदा देवी मंदिर ट्रस्ट्रचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ कमिटी यांची बैठक सुरू होती. नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या या बैठकीत भास्कर जाधव यांनी अचानकपणे येऊन गोंधल घातला. सुरुवातीला त्यांनी मंदिरातच शिव्यांची लाखोली वाहिली. यावेळी एका वयोवृद्ध नागरिकाने या प्रकाराचा मोबाईल व्हिडिओ केला. त्यावेळी भास्कर जाधव यांनी त्या ज्येष्ठ व्यक्तीलाही मारहाण केली. भास्कर जाधव मंदिरातील बैठकीत शिव्या देतानाचा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद झाला होता. त्यानंतर, गावच्या वादावर पडदा पडावा म्हणून मी तिथे गेलो होतो. वाद वाढू नये अशीच माझी भूमिका होती. मला कुठलेही समर्थन करण्याची आवश्यकता नसल्याचे भास्कर जाधव म्हणाले होते.
(हेही वाचाः …म्हणून मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर साताऱ्यात उतरलेच नाही!)
Join Our WhatsApp Community