विधानसभेत भास्कर जाधवांचे ‘माझी बॅट, माझी बॅटिंग’

भास्कर जाधवांनी स्वतःच केली कारवाईची मागणी आणि स्वतःच दिले आदेश.

वादळी पावसाळी अधिवेशनाच्या दुस-या दिवशी विधान भवनात पुन्हा एकदा सावळा गोंधळ पहायला मिळाला. भाजपच्या प्रती विधानसभा स्थापन करण्यावरुन विधानसभेत सत्ताधा-यांनी भाजपवर कारवाई करण्याची मागणी केली. पण आमदार म्हणून ही मागणी करणा-या शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी, स्वतःच तालिका अध्यक्षांच्या नात्याने ही कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे थोडक्यात हा प्रकार म्हणजे माझी बॅट, माझी बॅटिंग या प्रकारचाच म्हणावा लागेल.

भाजपने स्थापन केली प्रती विधानसभा

12 आमदारांच्या निलंबनानंतर भाजपने दुस-या दिवशी आक्रमक पवित्रा घेतला. भाजपने अधिवेशनावर बहिष्कार टाकला. पावसाळी अधिवेशनाच्या दुस-या दिवशी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भाजपच्या आमदारांनी विधान भवनाच्या आवारात प्रती विधानसभा स्थापन केली. या विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी सरकार विरोधात निषेध ठराव मांडला. यावेळी भाजपकडून माईक आणि लाऊड स्पीकरचा वापर करुन भाषणं देण्यात आली. तसेच या प्रती विधानसभेचे थेट प्रक्षेपण देखील करण्यात आले.

(हेही वाचाः विधानसभेच्या आवारात भाजपने स्थापन केली दुसरी विधानसभा! अधिवेशनाच्या दुस-या दिवशीही राडा)

जाधवांची कारवाईची मागणी

भाजपच्या या कृतीचे पडसाद सभागृहात चालू असलेल्या अधिवेशनाच्या कामकाजात उमटले. अशाप्रकारे विधान भवनाच्या आवारात संसदीय कामकाजाशिवाय कुठलेही कामकाज करायचे असेल तर त्यासाठी विधानसभा अध्यक्षांची परवानगी घेणे आवश्यक आहे. पण कुठल्याही परवानगीशिवाय विधानभवनाच्या पाय-यांवर माईक आणि स्पीकर लाऊन भाषणे ठोकण्यात येत आहेत. त्यामुळे या विरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भास्कर जाधव यांनी केली.

स्वतःच केली कारवाई

कारवाईच्या मागणीनंतर काही वेळातच आमदार भास्कर जाधव विधानसभेचे तालिका अध्यक्ष म्हणून अध्यक्ष महोदयांच्या खुर्चीवर विराजमान झाले. त्यावेळी त्यांनी अध्यक्ष या नात्याने माईक आणि स्पीकर बंद करण्याचे, तसेच प्रती विधानसभेचे थेट प्रक्षेपण तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले. त्यांच्या आदेशानुसार मार्शलनी कारवाई करत भाजप आमदरांकडून माईक हिसकावून घेतले आणि थेट प्रक्षेपण थांबवले.

(हेही वाचाः भास्कर जाधव सोंगाड्या! नितेश राणेंचा घणाघात)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here