सरनाईकांचा ‘पत्र’प्रताप… म्हणाले, शिवसेनेने भाजपशी जुळवून घेतलेले बरे!

167

शिवसेना आमदार गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यामागील ईडीच्या ससेमि-यामुळे चर्चेत आहेत. त्यामुळे ते अज्ञातवासात गेल्याचे म्हटले जात असताना, आता मात्र त्यांनी थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीत आपले मत मांडले आहे. ज्या काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत शिवसेना सत्तेत आहे त्याच काँग्रेस-राष्ट्रवादीची तक्रार त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस फोडाफोडीचे राजकारण करत शिवसेनेला कमकुवत करत आहेत, त्यामुळे या परिस्थितीत आपण भाजपशी जुळवून घेतलेले बरे, असे मत त्यांनी मांडले आहे. त्यामुळे या त्यांच्या पत्राची चांगलीच चर्चा होत आहे.

काय आहे पत्रात?

  • एकीकडे आपण राजकारण बाजूला ठेऊन मुख्यमंत्री पदाला प्रामाणिकपणे न्याय देत असताना, दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीमुळे शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला असे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या लोकांना वाटत आहे.
  • काँग्रेस पक्ष “एकला चलो रे” ची भूमिका घेत आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेचे नेते, कार्यकर्ते फोडत असल्याचे चित्र दिसत आहे.
  • महाविकास आघाडीतील काही मंत्री व काही सनदी अधिकारी केंद्रीय तपास यंत्रणेचा ससेमिरा आपल्या पाठीमागे लागू नये म्हणून केंद्रातील सत्ताधारी पक्षासह आपल्या नकळत छुपी हातमिळवणी करत आहेत.
  • काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांची कामे झटपट होतात, मात्र आपला मुख्यमंत्री असूनही शिवसेना आमदारांची कामे होत नाहीत, अशी काही आपल्या पक्षातील आमदारांमध्ये अंतर्गत नाराजी आहे, या गोष्टीची त्यांना खंत वाटते.
  • भाजपशी युती तोडून शिवसेना पक्षाने, काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठे करण्यासाठी महाविकास आघाडी” स्थापन केली की काय ? अशी चर्चा आहे.

WhatsApp Image 2021 06 20 at 1.11.18 PMWhatsApp Image 2021 06 20 at 1.07.49 PM

  • सत्तेत एकत्र राहून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आपलेच कार्यकर्ते फोडत असेल, आपला पक्ष कमकुवत करत असेल,तर या स्थितीत पुन्हा एकदा आपण पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्याशी जुळवून घेतलेले बरे.
  • यामुळे  प्रताप सरनाईक, अनिल परब, रवींद्र वायकर या आपल्या सहकाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना होणारा नाहक त्रास तरी थांबेल, अशी अनेक कार्यकर्त्यांची भावना आहे.
  • कोणताही गुन्हा किंवा चूक नसताना केंद्रीय तपास यंत्रणांकडून आम्हाला नाहक त्रास होत आहे.
  • केंद्रीय तपास यंत्रणेचा दलाल व शिवसेनेमुळे “माजी खासदार” झालेल्या नेत्यांकडून जी बदनामी सुरु आहे, त्यालाही कुठे तरी आळा बसेल.
  • आम्हाला टार्गेट करत असताना आमच्या कुटुंबियांवर सुध्दा सतत आघात होत आहेत, खोटे आरोप होत आहेत.
  • एका केसमधून जामीन मिळाला की तात्काळ जाणीवपूर्वक दुसऱ्या केसमध्ये गुंतवणे, त्यातून बाहेर आलो की तिसऱ्या केसमध्ये गुंतवणे, अशा प्रकारचे जाणीवपूर्वक काम या तपास यंत्रणा करत आहेत.
  • आपल्या एका निर्णयामुळे हे कुठेतरी थांबेल.

  • युद्धात लढत असताना अभिमन्युसारखे लढण्यापेक्षा किंवा कर्णासारखे बलिदान देण्यापेक्षा, धनुर्धारी अर्जुनासारखे लढावे असे मला वाटते.
  • त्यामुळे राज्यात आपली सत्ता असताना सुध्दा व राज्य शासनाचे किंवा इतर अन्य कुठल्याही नेत्याचे सहकार्य मिळाले नसताना कुणालाही त्रास न देता मी माझी कायदेशीर लढाई माझ्या कुटुंबासह गेले ७ महिने लढत आहे.
  • पुढील वर्षी मुंबई, ठाणे व अन्य महापालिकांच्या निवडणुका आहेत. आतापर्यंत राज्यात आपली युती तुटली असली, तरी युतीच्या नेत्यांचे वैयक्तिक संबंध, जिव्हाळा अनेक नेत्यांमध्ये तसाच आहे.
  • ते अजून तुटण्याआधी परत जुळवून घेतलेले बरे होईल. तर त्याचा फायदा आमच्या सारख्या काही कार्यकर्त्यांना व शिवसेनेला भविष्यात होईल असे मला वाटते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.