शिवसेना आमदाराची भाजपा नगरसेविकेच्या वॉर्डात ढवळाढवळ

यामुळे भविष्यात राऊत विरोधात भाजपा यांच्यात संघर्ष उफाळून आल्याचे नक्कीच पहायला मिळेल, असे बोलले जात आहे.

72

शिवसेनेच्या पक्षीय राजकारणात शिवसेना नेते संजय राऊत यांची दबंगगिरी सुरू असताना, त्यांचे बंधू सुनील राऊतही आपल्या विभागात भाजपापुढे आव्हान निर्माण करत असल्याच्या चर्चा सध्या विक्रोळी-कांजूरमार्ग परिसरात ऐकायला मिळत आहेत. सुनील राऊत यांच्या वाढत्या उपद्रवामुळे भाजपा नगरसेवकांना काम करण्यास अनेक अडचणी येत आहेत. नगरसेवक निधीतून केल्या जाणाऱ्या कामांची यादी आधीच मिळवून ती कामे आमदार अथवा खासदार निधीतून केली जात आहेत.

महापालिकेत शिवसेनेची सत्ता असल्याने प्रशासनातील अधिकाऱ्यांना हाताशी धरत राऊत हे भाजपा नागरसेवकांच्या कल्पना आणि त्यांनी प्रस्तावित केलेली कामे, स्व:निधीतून करत आहेत. त्यामुळे एकप्रकारे भाजपा नगसेवकांच्या कामात खोडा घालण्याचा प्रयत्न आमदार सुनील राऊत करत असल्याचे बोलले जात आहे. परंतु भाजपाने सध्या शांत राहत योग्य वेळी योग्य उत्तर देण्याची तयारी केल्याने, भविष्यात राऊत विरोधात भाजपा यांच्यात संघर्ष उफाळून आल्याचे पहायला मिळेल.

(हेही वाचाः रस्त्यांच्या निविदांवरुन भाजपा-शिवसेना भिडले)

भाजपा नगरसेवकांना त्रास देण्यास सुरुवात

लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपा युती झाल्यानंतरही युतीचे उमेदवार असलेल्या मनोज कोटक यांचा प्रचार करताना, विक्रोळीतील शिवसेना आमदार सुनील राऊत यांनी कमळाच्या चिन्हाऐवजी धनुष्यबाण हे चिन्ह लाऊनच त्यांचा प्रचार केला होता. त्यामुळे युती असताना भाजपाशी ‘दो गज की दुरी…’ ठेवणाऱ्या सुनील राऊत यांनी मोठ्या बंधूंप्रमाणे मतदार संघात आपले उपद्रव मूल्य वाढवण्यावर भर दिला आहे. त्यामुळे विक्रोळी विधानसभा मतदार संघात भाजपा नगरसेवकांना त्रास देण्यास त्यांनी सुरुवात केली आहे.

अशी आहे राऊतांची ढवळाढवळ

कांजूर गाव येथील भाजपा नगरसेवक सारिका पवार यांच्या मतदार संघात सुनील राऊत ढवळाढवळ सुरू असून, अनेक विकासकामांच्या निविदा त्यांच्या नगरसेवक निधीतून प्रस्तावित केल्यानंतर हीच कामे राऊत हे आपल्या आमदार अथवा खासदार निधीतून करत असल्याच्या तक्रारी आहेत. सारिका पवार यांनी प्रस्तावित केलेली कामे रखडवून ठेवणे, कामे रद्द करणे असे प्रकार होत असल्याचा आरोप माजी नगरसेवक मंगेश पवार यांनी केला आहे.

(हेही वाचाः आयुक्त नक्की कुणाचे?)

राऊत आमदार की नगरसेवक?

सुनील राऊत हे आमदार आहेत. त्यांनी आमदार निधीतून कामे करावीत की. परंतु एक नगरसेविका जर आपल्या विभागात विकासकामे करत असेल, तर त्यांची यादी परस्पर मिळवून ती कामे आपल्या आमदार वा खासदार निधीतून करणे किती उचित आहे?, असा सवाल पवार यांनी केला आहे. त्यामुळे राऊत हे आमदार आहेत की नगरसेवक हाच प्रश्न जनतेला पडला आहे, असा टोलाही पवारांनी लगावला.

योग्य वेळी जागा दाखवू- पवार

एका नगरसेविकाला नामोहरम करताना ते आपण आमदार असल्याचे आणि आमदाराचे कर्तव्यही विसरत चालले आहेत. ते विधिमंडळ, जिल्हाधिकारी कार्यालय व म्हाडा कार्यालय इथे न जाता केवळ महापालिका एस विभागातच भाजपाची नगरसेविका काय काम करते याकडे लक्ष ठेऊन असतात. महापालिकेत सत्ता असल्याने या सत्तेचा दुरुपयोग सध्या ते करत असून, योग्य वेळी त्यांना त्यांची जागा दाखवली जाईल, असाही इशारा मंगेश पवार यांनी दिला आहे.

(हेही वाचाः बेस्टला झोपवायला चालली शिवसेना: डिजिटल तिकिटांच्या निविदेत कोट्यवधींचे होणार नुकसान)

यापूर्वी सेनेच्या ‘या’ आमदारावर आरोप

दरम्यान, याबाबत आमदार सुनील राऊत यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही. यापूर्वी शिवसेना आमदार दिलीप लांडे यांनी भाजपा नगरसेवक हरिष भांदिर्गे यांच्या विभागात हस्तक्षेप केल्याचा आरोप झाला होता. विभागातील पाणी समस्या ही आमदारांच्या सांगण्यानुसारच होत असल्याचा आरोपही भांदिर्गे यांनी केला होता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.