राऊत स्किझोफ्रेनिक पेशंट, त्यांनी तपासणी करुन घ्यावी! शिंदे गटातील आमदाराचा हल्लाबोल

104

शिंदे गटातील आमदारांकडून आता शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्यावर घणाघाती टीका होत आहे. संजय राऊत यांनी शिंदे गटातील आमदारांबाबत केलेल्या विधानांमुळे या आमदारांमध्ये तीव्र नाराजी आहे. आता शिंदे गटातील आमदार विजय शिवतारे यांनी संजय राऊत यांच्यावर टीकेचा जहरी बाण सोडला आहे. संजय राऊत यांना स्किझोफ्रेनिया झाला असून त्यांनी तपासणी करुन घेण्याची गरज असल्याचे शिवतारे यांनी म्हटले आहे.

राऊत स्किझोफ्रेनिक पेशंट

शिंदे गटातील आमदारांना शिवसेनेसंदर्भातील निर्णय घेण्याचा हक्क नसल्याचे राऊत यांनी म्हटले होते. त्यांच्या या विधानाला पंढरपूरातील शिंदे गटाचे आमदार विजय शिवतारे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत यांना स्वतःलाच अधिकार नाहीत. ते मला स्किझोफ्रेनिक पेशंट असल्यासारखे वाटत आहेत. स्किझोफ्रेनिया हा आजार दिसून येत नाही. या आजारामुळे रुग्णाला मध्येच भास होतात. गोवा, उत्तर प्रदेशात निवडणुकांसाठी संजय राऊत हे चुकीचे आणि बाळासाहेबांच्या विरोधी विचार घेऊन गेले. पण त्यावेळी शिवसेनेच्या 139 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले.

(हेही वाचाः हवा येऊ द्या मध्ये शहाजी बापूंचे पडले ‘पितळ’ उघडे)

राऊतांनी तपासणी करावी

त्यानंतर राऊतांना दिल्ली काबीज करण्याचे स्वप्न पडले. उद्धव ठाकरे हे देशाचं प्रतिनिधीत्व करतील, असेही त्यांनी म्हटले होते. शरद पवार यांच्यासारखा मोठा नेता 8 ते 9 खासदार घेऊन देशाचा पंतप्रधान होणं शक्य नसल्याचे सांगत असताना त्यांचे निष्ठावंत शिष्य संजय राऊत मात्र उद्धव ठाकरे पंतप्रधान होण्याची वल्गना करतात. त्यामुळे अशी फसवणूक करण्यापेक्षा संजय राऊत यांनी एकदा तपासणी करुन घ्यावी. ही सगळी लक्षणं स्किझोफ्रेनियाची असल्याची घणाघाती टीका शिवतारे यांनी संजय राऊत यांच्यावर केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.