शिवसेनेच्या आमदारांची नाराजी, उद्धव ठाकरेंना पडणार का भारी?

89

मुंबई – राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता येऊन आता १ वर्ष पूर्ण होईल, तरी देखील तिन्ही पक्षामधील अंतर्गत नाराजी नाट्य काही थांबल्याचे दिसत नाही. त्यातच आता अंतर्गत कुरघोडींमुळे शिवसेनेचेच आमदार नाराज झाले असून, या आमदारांनी आपली नाराजी थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारी बोलून दाखवली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेच्या आमदारांच्या बैठकांचा सिलसीला सुरु असून, या बैठकीमध्ये अनेक आमदारांनी महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्याबाबत तक्रारीचा पाढा वाचून दाखवला. मतदार संघात कामे होत नसल्याने मतदार संघामध्ये तोंड दाखवायलाही जागा उरली नसल्याचे एका आमदाराने ‘हिंदुस्थान पोस्ट’सोबत खासगीत बोलताना सांगितले. त्यामुळे शिवसेनेच्या या आमदारांची नाराजी भविष्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची डोकेदुखी तर ठरणार नाही ना असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.

राष्ट्रवादीचे शिवसेनेवर वर्चस्व 

शिवसेनेच्या एक ज्येष्ठ आमदाराने ‘हिंदुस्थान पोस्ट’सोबत बोलताना सांगितले की, जरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असले तरी देखील मंत्रालयामध्ये दबदबा हा राष्ट्रवादीचा पहायला मिळत आहे. आम्हाला निधी विकास निधी मिळत नाही, मात्र राष्ट्रवादीच्या आमदारांना त्यांच्या मतदारसंघात कामे करण्यासाठी कसा निधी दिला जातो? तसेच ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे पालकमंत्री आहेत त्या ठिकाणी शिवसेना आमदारांसोबत दुजाभाव होत आहे, असेही त्यांनी सांगितले.

शिवसेनेचे माजी मंत्रीही नाराज

शिवसेना आमदारांच्या नाराजीबद्दल शिवसेनेचा एक ज्येष्ठ नेता, माजी मंत्री यांनीही आमदारांची नाराजी योग्य असल्याचे सांगितले. जर आमदार त्यांच्या मतदारसंघामध्ये जनतेची  कामे करु शकत नसेल तर ते पुढच्या निवडणुकीला जनतेसमोर कोणत्या तोंडाने जाणार, त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावर तोडगा नक्की काढतील.

कॅबिनेट मंत्री – राज्यमंत्र्यांमध्ये वादावादी 

एकीकडे शिवसेनेचे आमदार मतदारसंघातील कामे करता येत नसल्याने नाराज असताना ठाकरे सरकारमधील मंत्र्यांमध्ये देखील आलबेल नसल्याचे समजते आहे. कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्र्यामध्ये सध्या अंतर्गत वाद सुरु असून, काही राज्यमंत्र्यांनी याची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केल्याची देखील माहिती मिळत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.