शिवसेनेच्या 18 पैकी 12 खासदारांनी देखील शिवसेना आमदारांच्या पावलावर पाऊल ठेवत शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे राज्यासोबत देशाच्या राजकारणात देखील मोठी खळबळ उडाली आहे. या 12 खासदारांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिंदे गटाचे लोकसभा गटनेते राहुल शेवाळे यांनी एकामागोमाग एक गौप्यस्फोट केले आहेत.
जून 2021 मध्ये उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांच्यात झालेल्या भेटीत शिवसेना-भाजप युतीबाबत चर्चा झाल्याचे आम्हाला स्वतः उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याचा मोठा गौप्यस्फोट राहुल शेवाळे यांनी केला आहे. पण ही युती का होऊ शकली नाही, याचे कारणही शेवाळे यांनी स्पष्ट केले आहे.
(हेही वाचाः जे उद्धव ठाकरेंनी सांगितले तेच आम्ही केले, शिंदे गटातील 12 खासदारांचा खळबळजनक दावा)
उद्धव ठाकरे होते युतीसाठी प्रयत्नशील
ज्यावेळी आमदारांनी बंडाळी केली होती त्यावेळी शिवसेनेच्या सर्व खासदारांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 21 जून रोजी बैठक घेतली. त्यावेळी आम्ही पक्षासोबतच राहण्याची भूमिका सांगितली होती. त्यावेळी आम्ही 2019 ची लोकसभा निवडणूक ही शिवसेना-भाजप युतीच्या माध्यमातून लढवली असून गेल्या दोन-अडीच वर्षांत आपल्याला महाविकास आघाडीमुळे त्रास होत असल्याचे उद्धव ठाकरे यांना सांगितले. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी सर्व खासदारांना आपण युतीसाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले, असा गौप्यस्फोट गटनेते राहुल शेवाळे यांनी केला आहे.
यामुळे भाजप नाराज
उद्धव ठाकरे यांनी जून 2021 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांच्याशी पुन्हा एकदा युती करण्याबाबत चर्चा केल्याचे उद्धव ठाकरे यांनी आम्हाला सांगितले. पण त्यानंतर जुलै महिन्यात झालेल्या विधानसभा अधिवेशनात भाजपच्या 12 आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यामुळे भाजपचे पक्षश्रेष्ठी नाराज झाल्याचे स्वतः उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते.
(हेही वाचाः आता संसदेतील शिवसेना कार्यालयाचा ताबा घेण्याची शिंदे गटाची हालचाल)
म्हणून खासदार नाराज
पण युतीसाठी प्रयत्न करणा-या उद्धव ठाकरे यांच्यासोबत अलिकडे झालेल्या बैठकीत 2024 ची लोकसभा निवडणूक आपण युतीच्या माध्यमातूनच लढायला हवी, असा आग्रह खासदारांनी धरला. पण त्यावेळी महाविकास आघाडीमधून निवडणूक लढवण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी सांगितला, त्याला आम्ही विरोध दर्शवला. तसेच उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतही शिवसेनेने युपीएच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांना पाठिंबा द्यायचे ठरवले.
त्यामुळे खासदारांमध्ये नाराजी पसरली. त्यामुळे आमच्या भाजपशी युती करण्याच्या भूमिकेला उद्धव ठाकरेंनी सकारात्मक प्रतिसाद न दिल्यामुळे आम्ही हा निर्णय घेतल्याचे राहुल शेवाळे यांनी स्पष्ट केले आहे.
Join Our WhatsApp Community