शिवसेनेच्या आमदारांनंतर आता 12 खासदारांनी देखील शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे आता उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला असल्याचे सांगण्यात येत आहे. या सर्व 12 खासदारांनी दिल्लीत मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर या 12 खासदारांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली.
या पत्रकार परिषदेत शिंदे गटाचे लोकसभेतील गटनेते राहुल शेवाळे यांनी 12 खासदारांच्या भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी आपण शिंदे गटासोबत जाण्याची घेतलेली भूमिका ही उद्धव ठाकरेंनीच केलेल्या आवाहनानुसार घेतली असल्याचा खळबळजनक दावा राहुल शेवाळे यांनी केला आहे.
(हेही वाचाः राऊतांचा मॅटिनी शो आता बंद झालाय, मुख्यमंत्री शिंदेंचा टोला)
उद्धव ठाकरेंनी केले होते आवाहन
खासदारांसोबत झालेल्या बैठकीत स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपण भाजपशी चर्चा करुन युतीसाठी प्रयत्न करत असल्याचे सांगितले. त्यावेळी तुम्ही देखील तुमच्या पद्धतीने युतीसाठी प्रयत्न करा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी खासदारांना केले होते. त्यामुळेच आम्ही आज जो निर्णय घेतला आहे तो त्यांनी बैठकीत सांगितलेल्या आवाहनानुसार झाला असल्याचा मोठा गौप्यस्फोट खासदार राहुल शेवाळे यांनी केला आहे.
हे 12 खासदार शिंदे गटात
श्रीकांत शिंदे, राहुल शेवाळे, कृपाल तुमाणे, भावना गवळी, हेमंत पाटील,प्रतापराव जाधव,श्रीरंग बारणे, संजय मंडलिक,सदाशिव लोखंडे,राजेंद्र गावित, हेमंत गोडसे, धैर्यशील माने या खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दिल्लीत भेट घेऊन हे 12 खासदार शिंदे गटात सहभागी झाले आहेत.
Join Our WhatsApp Community