भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. अशातच शिवसनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपासह चंद्रकांत पाटील यांच्यावर चांगलाच हल्लोबोल केला आहे. हिंदूंकडे हिंदू म्हणून मत मागणारा शिवसेना हा देशातील पहिला पक्ष आहे. तसेच हिंदूंची व्होट बँक देशात आहे, हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी पहिल्यांदा सिद्ध केले आहे. यासह हिंदुत्व हे केवळ मंदिरांपुरतं मर्यादित नाही किंवा राजकारणापुरतं देखील मर्यादित नाही तर ते त्यापुढचं असल्याचेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.
काय म्हणाले नेमकं राऊत?
चंद्रकांत पाटील काय म्हणतात? त्यावर भूमिका ठरत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू व्होट बँक तयार केली की, नाही, ते मला माहीत नाही. पण, त्यांनी या देशात पहिलं हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. छत्रपती शिवाजी महाराजांचाच विचार हा हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि त्यापूर्वी वीर सावकर यांनी महाराष्ट्रात रुजवला. बाळासाहेब ठाकरे यांना हिंदूहृदयसम्राट ही उपाधी देशाच्या जनतेनं दिली. आणि बाळासाहेब ठाकरे हे देशातील एकमेव नेते आहेत, भाजप नेते प्रमोद महाजन म्हणाले होते की, त्यांना बाळासाहेबांनी सांगितलं होतं, ज्याप्रमाणे मी मराठी माणसाला मराठी म्हणून मत द्यायला लावलं, त्याप्रमाणे मी देशातील हिंदूंना हिंदू म्हणून मत द्यायला लावीन, असे राऊत म्हणाले.
(हेही वाचा – सर्वोच्च न्यायलय म्हणाले, ‘अधिकार मिळायलाच हवा, मग व्यवसाय कोणताही असो!’)
हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर निवडणूक लढल्याने निलंबन
तर पार्लेतील पोट निवडणुकीत शिवसेनेने हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मतदान मागितले होते. तेव्हा कोणाच्याही मनात हा विचार आला नव्हता की, हिंदू म्हणून आपण निवडणूक लढायला हवी आणि हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरुन शिवसेनेच्या आमदारांचं निलंबन झाले. हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढलो, हिंदू म्हणून आम्ही मतं मागितली, त्यामुळे शिवसेनेचे दोन आमदार रमेश प्रभू, सुर्यकांत महाडिक आणि आणखी एक आमदार होते, त्यांचे ही हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर निवडणूक लढल्यामुळे निलंबन करण्यात आले.
बाबरी पाडणाऱ्या शिवसैनिकांचा अभिमान
अयोध्येत बाबरीचं पतन होत असताना सध्याचे हिंदू वोट बँकवाले पळून गेले. शिवसेना आणि शिवसेनाप्रमुख त्यावेळी ठामपणे उभे राहिले. बाबरी पाडणाऱ्या शिवसैनिकांचा अभिमान आहे, असं संजय राऊत म्हणाले. आमचं हिंदुत्व शेपूट घालणारे आणि पळपुटं नाही, असं संजय राऊत यानी सांगितले.
काय म्हणाले चंद्रकात पाटील?
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी पुण्यातील भाजप कार्यालयात पत्रकार परिषदेला संबोधित केले. त्यावेळी त्यांनी उमेदवारांच्या निवडणूक तिकिटाबाबत भाष्य केले. तिकिट हे पक्षाचे असते. व्होट बँक पक्षाची असते. व्होटबँक ही वर्षानुवर्षे मेहनत घेऊन तयार केलेली असते. छत्रपती शिवाजी महाराजांनी ही हिंदुत्वाची व्होट बँक तयार केली. तर सध्याच्या काळात या व्होट बँकेवर अटल बिहारी वाजपेयी, आडवाणी, मोदी यांनी कळस चढवला असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले.
Join Our WhatsApp Community