काही दिवसांपूर्वीच शिवशक्ती आणि भीमशक्तीच्या युतीची उद्धव ठाकरे यांनी घोषणा केली होती. पण आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांच्या एका विधानामुळे महाविकास आघाडीत ठिणगी पडली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस दुखावली गेली आहे. याच पार्श्वभूमीवरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकरांना सुनावले आहे आणि जरा जपून शब्द वापरा असा सल्ला दिला आहे.
संजय राऊत काय म्हणाले?
प्रसार माध्यमांसोबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, ‘प्रकाश आंबेडकर यांच्या विधानाशी आम्ही अजिबात सहमत नाही. चार दिवसांपूर्वीच प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षासोबत शिवसेनेची युती झाली. उद्धव ठाकरे यांनी या युतीसंदर्भात घोषणा केली. पण प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीतील जे प्रमुख पक्ष आहेत, मग काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल त्यांच्याविषयी अशाप्रकारची विधान करणे हे आम्हाला अजिबात मान्य नाही. विशेषतः शरद पवार हे देशासह महाराष्ट्राचे एक उत्तुंग नेते आहेत. ते भाजपचे आहेत, असे म्हणणे हे त्यांच्या आतापर्यंतच्या कारर्किदला मोठा आरोप आहे. जर ते भाजपचे असते, तर महाराष्ट्रात त्यांनी अडीच वर्षांपूर्वी भाजपचे सरकार दूर ठेवून शिवसेनेच्या आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली मविआचे सरकार येऊ दिले नसते. प्रत्येक वेळी त्यांनी भाजपला रोखण्याचा प्रयत्न केला. आज सुद्धा आपण विरोधी पक्षाच्या एकीचा विषय आपण करतो तेव्हा शरद पवारांचे नाव प्रामुख्याने घेतो. समस्त विरोधी पक्षांना एकत्र करायचे काम शरद पवार करू शकतात. त्यामुळे अशा प्रकारच्या भूमिका घेताना प्रकाश आंबेडकरांनी जरा जपून शब्द वापरावे.’
(हेही वाचा – राष्ट्रवादी काँग्रेस आणि वंचित आघाडीत वाद; प्रकाश आंबेडकरांना सुनावले)