कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादावर राऊतांची बोम्मई सरकारला थेट धमकी; म्हणाले, ‘…तर याद राखा’

86

कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यात सीमावाद पुन्हा एकदा सुरू झाला. आता महाराष्ट्र सरकारकडून हा तिढा सोडवण्यासाठी योग्य ती पावलं उचलण्यात येत आहे. अशातच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली मधील जत तालुक्याचीही मागणी केली. यामागणीनंतर हा वाद पुन्हा एकदा पेटला आहे. त्याच संदर्भात शिवसेनेचे खासदार नेते संजय राऊत यांनी कर्नाटक सरकारला महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहाल तर याद राखा अशी थेट धमकी दिली आहे.

(हेही वाचा – भगतसिंह कोश्यारींना तत्काळ पदावरुन दूर करा; उदयनराजेंनी केली पंतप्रधानांकडे तक्रार)

काय म्हणाले राऊत

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या वर्मावर घाव घातलेला आहे. महाराष्ट्रावर राज्य करताना आम्हाला लाज वाटली पाहिजे. आत्तापर्यंत असं बोलायची कोणाचीही हिंमत झाली नव्हती. महाराष्ट्रात कमजोर सरकार आहे, सरकारचे प्रमुख देवधर्म तंत्रमंत्र ज्योतिषात अडकले आहेत, त्यामुळे गुजरात, कर्नाटक अशा अन्य राज्यांतून महाराष्ट्रावर हल्ले होत आहेत. कोणी गावं पळवतंय कोणी उद्योग. पण सरकार त्यावर ठामपणे भूमिका घेताना दिसत नाही, असे संजय राऊत म्हणाले.

कर्नाटकात भाजपाचं सरकार आहे, राज्यातही भाजपाचंच सरकार आहे. तरीही हा वाद सुरू आहे. गुजरातने उद्योग पळवायचे आणि कर्नाटकने गावं, तालुके, जिल्हे पळवायची आणि महाराष्ट्राला या देशाच्या नकाशावरुन पुसून टाकायचे असा कट रचला जात असल्याची मला भिती वाटत आहे. राज्याचं आराध्य असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांवर हल्ले करायचे आणि आमचं मनोधैर्य खच्ची करायचं, असं षडयंत्र कुठे पडद्यामागे रचले जात का, अशी भीती आता मला वाटू लागल्याची खंत राऊतांनी व्यक्त केली आहे.

पुढे राऊत असेही म्हणाले की, आत्तापर्यंत सरकारमधले किती मंत्री गेले? पण आम्ही जाणार, लढणार कोणाची पर्वा करणार नाही. ४० आमदारांचा गट महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी शिवसेनेतून बाहेर पडला, कुठे गेला तुमचा स्वाभिमान, कुठे शेण खातोय. एक मुख्यमंत्री महाराष्ट्रातील गावे पळवतोय, एक राज्य महाराष्ट्रातील उद्योग खेचून घेतोय. षंढासारखे बसला आहात तुम्ही..मी वारंवार सीमाभागात गेलो आहे, आता परत जाईन. वेळप्रसंगी आम्ही या लढाईसाठी तुरुंगवास भोगू. बोलत नाही, ही धमकी देतोय, महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहाल तर याद राखा. आम्ही आजही शांत आहोत, संयमी आहोत. हे सरकार सिलेंडर वर करून गुडघ्यावर बसलं असलं तरी शिवसेना खंबीर असल्याचे राऊतांनी म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.