महाविकास आघाडीतल्या नेत्यालाच राऊतांनी दिला असा सल्ला!

137

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण कोणत्या न् कोणत्या कारणामुळे चांगलंच चर्चेत आहे. अशातच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी हे महाविकासआघाडी सरकारवर नाराज आहे, अशा चर्चाना उधाण आले आहे. तर याच नाराजीतून राजू शेट्टी महाविकासआघाडीला राम राम करणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महाविकासआघाडीतील राजू शेट्टी यांना एक सल्ला दिल्याचे वृत्त माध्यमातून समोर येत आहे.

काय दिला राऊतांनी सल्ला…

राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून केंद्र सरकारविरोधात आंदोलन करावे, असा अप्रत्यक्ष सल्ला संजय राऊत यांनी दिला आहे. राजू शेट्टी हे शेतकर्‍यांचे नेते आहेत, त्यांचेही काही प्रश्न असतात. यासाठी त्यांनी दिल्लीत जाऊन जंतरमंतर येथे आंदोलन करावे, आम्ही देखील त्या आंदोलनात सहभागी होऊ, कारण शेतकऱ्यांच्या संदर्भात काही धोरणे ही केंद्र सरकारची असतात. त्यामुळे त्यांनी जर असे आंदोलन केले तर आम्ही देखील त्यांच्या पाठीशी राहू. राजू शेट्टी हे झुंजार नेते आहेत, लढवय्ये नेते आहेत, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ते प्रामाणिकपणे लढत असतात असेही राऊत म्हणाले.

(हेही वाचा – रस्त्यांवरील बेवारस वाहनांविरोधात पुन्हा महापलिका इन ऍक्शन!)

म्हणून राजू शेट्टींची ठाकरे सरकारवर नाराजी

कोल्हापुरात येत्या ५ एप्रिल रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची राज्य कार्यकारिणीची बैठक होत असून त्यामध्ये याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपची साथ सोडत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. सरकारला दोन वर्षे झाली तरी संघटनेला निर्णय प्रक्रियेत कुठेच स्थान दिले जात नसल्याने माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह संघटनेचे सर्वच नेते नाराज आहेत. वीज पुरवठा, महापूर नुकसान भरपाई, पीक विमा, प्रोत्साहन अनुदान यासह काही मागण्या संघटनेने सरकारकडे केल्या. पण त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने नाराजी वाढत असल्याने राजू शेट्टी यांच्याकडून महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचे संकेत दिले जात असल्याचे सांगितले जात आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.