राज्यसभेच्या निवडणुकीत आपला उमेदवार निवडून यावा यासाठी आता मतांची जुळवाजुळव सुरु झाली आहे. अवघे तीन दिवस बाकी आहेत. महाविकास आघाडीने सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे. अपक्ष आमदारांचीही बैठक बोलावण्यात आली आहे.
शिवसेनेने मतांसाठी एमआयएमच्या आमदाराला गळ घातल्याच्या बातम्या समोर येत आहेत. यावर आता MIM चे अध्यक्ष असरुद्दीन ओवैसी यांनी आपली भूमिका मांडली आहे. भाजपचा पराभव व्हावा, यासाठी महाविकास आघाडीने उघडपणे पाठिंबा मागावा अशी भूमिका ओवैसी यांनी जाहीर केली आहे. एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार इम्तियाज जलील यांनी याबाबत माहिती दिली आहे.
गरज असेल तर संपर्क साधा
महाविकास आघाडीने अजून आमच्याशी संपर्क साधला नाही. त्यांनी संपर्क केला तर विचार करु. मात्र अद्याप कुणाला मतदान द्यायचे त्यावर आमचा निर्णय झालेला नाही, असे ओवैसी यांनी सांगितले. मविआकडून अजून कोणीही आमच्या आमदारांना संपर्क केला नसल्याचे, ओवैसी म्हणाले. त्यांना आमची गरज असेल तर आम्हाला संपर्क साधा, नाहीतर काही गरज नाही असे ओवैसी यांनी म्हटले.
दादा भुसे यांनी मागितला पाठिंबा
शिवसेनेने मतांची जुळवाजुळव करण्यासाठी अपक्ष आणि इतर छोट्या पक्षातील आमदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी कंबर कसली आहे. त्यातच शिवसेनेने मतांसाठी एमआयएमच्या आमदाराला गळ घातल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मंत्री दादा भुसे यांनी शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी एमआयएमचे मालेगावमधील आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांनी विनंती केली आहे. दादा भुसे यांनी पाठिंबा देण्यासाठी आपली भेट घेतल्याचे मौलाना मुफ्ती इस्माईल म्हणाले.