शिवसेनेला रिलायन्सकडून ‘बूस्ट’र

रिलायन्सने दिलेल्या या बूस्टवर शिवसेना पक्ष या लसीकरणाच्या माध्यमातून बूस्ट होत असल्याचे पहायला मिळत आहे.

मुंबईत महापालिकेच्यावतीने सर्व नगरसेवकांच्या प्रभागांमध्ये लसीकरण केंद्र चालू करण्यात आली आहेत. १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींच्या लसीकरणाची जबाबदारी खासगी रुग्णालयांवर सोपवण्यात आली आहे. त्यामुळे ४५ वर्षांवरील व्यक्तींसाठीची लसीकरण केंद्र महापालिकेच्या माध्यमातून सुरू असली, तरीही शिवसेनेच्या प्रत्येक नगरसेवक व शाखाप्रमुखांच्या माध्यमातून लसीकरण मोहीम राबवली जात आहे. रिलायन्स फाऊंडेशनच्या माध्यमातून शिवसेनेच्या प्रत्येक नगरसेवकांच्या प्रभागांमध्ये कोवॅक्सिन लस उपलब्ध करुन दिली जात आहे. त्यामुळे रिलायन्सने दिलेल्या या बूस्टवर शिवसेना पक्ष या लसीकरणाच्या माध्यमातून बूस्ट होत असल्याचे पहायला मिळत आहे.

दोन्ही डोस दिले जाणार

युवा सेनाप्रमुख आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या सहकार्याने आणि रिलायन्स फाऊंडेशनच्यावतीने मुंबईतील प्रत्येक नगरसेवकांच्या प्रभागांमध्ये लसीकरण मोहीम राबवली जात आहे. प्रत्येक नगरसेवक आणि शाखांमधून रावबल्या जाणाऱ्या लसीकरणामध्ये प्रत्येकी दोन हजार ते सहा हजार लसीकरण प्रत्येक दिवशी केले जात आहे. रिलायन्स फाऊंडेशनच्यावतीने केल्या जाणाऱ्या लसीकरणात कोवॅक्सिन लस दिली जात असून, पहिला डोस घेणाऱ्यांना दुसऱ्या डोसचीही तारीख दिली जात आहे. त्यामुळे दुसरा डोसही याच रिलायन्स फाऊंडेशनच्यावतीने उपलब्ध करुन दिला जाणार आहे.

(हेही वाचाः शिवस्मारकाचे करायचे काय? बांधकाम विभागापुढे प्रश्न)

शिवसेना शाखा लसीमय

मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीची जबाबदारी आता युवा नेते आणि पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वी लसीकरणाच्या माध्यमातून त्यांनी वातावरण ढवळून काढण्यास सुरुवात केली आहे. मागेल त्या शाखेला आणि मागेल त्या नगरसेवक, आमदाराला आदित्य ठाकरे हे रिलायन्स फाऊंडेशनच्या माध्यमातून लस उपलब्ध करुन देत असल्याने, प्रत्येक शिवसेनेच्या शाखा या लसीमय झालेल्या आहेत.

जनतेशी जोडण्याचा प्रयत्न

लसीकरणाच्या मोहिमेतून शाखाशाखांमधून पुन्हा एकदा शिवसैनिक सर्वसामान्य जनतेशी जोडला गेला आहे. विशेष म्हणजे खासगी रुग्णालयांमध्ये जिथे पैसे मोजावे लागत आहेत, तिथे ही लस मोफत उपलब्ध होत आहे. तसेच कोविशिल्डच्या तुलनेत कोवॅक्सिनचा दुसरा डोस २८ दिवसांमध्ये घेता येत असल्याने, आपल्या सर्व शिवसैनिकांना लसवंत बनवून त्यांचे कोविडपासून संरक्षण करण्याचाही प्रयत्न या माध्यमातून शिवसेना करत आहे.

(हेही वाचाः अद्याप तरी मुंबईकर सुरक्षित! ५० हजार कोरोना चाचण्या, रुग्ण मात्र अडीचशे! )

यांनी राबवली मोहीम

आतापर्यंत माजी आरोग्य समिती अध्यक्ष, नगरसेवक अमेय घोले, नगरसेविका प्रिती पाटणकर, नगरसेवक समाधान सरवणकर, सभागृहनेत्या विशाखा राऊत, आमदार सदा सरवणकर, माजी महापौर व नगरसेविका श्रध्दा जाधव व युवा सेना पदाधिकारी पवन जाधव, नगरसेविका वैशाली शेवाळे, निधी शिंदे, नगरसेवक विठ्ठल लोकरे आदींसह शिवसेना नगरसेवक आणि शाखांमधून रिलायन्स फाऊंडेशनच्या माध्यमातून लसीकरण मोहीम राबवण्यात आली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here