राजकीय सत्तानाट्यात नवा ट्विस्ट, एकनाथ शिंदेंची राज ठाकरेंसोबत दुसऱ्यांदा ‘फोन पे चर्चा’!

81

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान, शिंदे गटाची ताकद दिवसेंदिवस वाढत असताना अद्याप कोणताही मार्ग स्पष्ट झालेला नाही. अशातच एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यात फोनवरून चर्चा झाली आहे. राज ठाकरेंवर नुकतीच हिप बोनची शस्त्रक्रिया पार पडली त्यानंतर त्यांना दोन दिवसात डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यामुळे ते राजकारणात सक्रिय होणार का? राज यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी एकनाथ शिंदेंनी फोन केला असवा, असे सांगितले जात आहे. मात्र एकनाथ शिंदेंकडून राज ठाकरेंना दुसऱ्यांदा करण्यात आलेला फोन हा फक्त चौकशीसाठीच कसा असेल, असे तर्क वितर्क लावून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत.

एकनाथ शिंदेंची राज ठाकरेंसोबत फोन पे चर्चा

दरम्यान, बंडखोर आमदारांच्या निलंबनावर शिवसेना ठाम असल्याने या प्रकऱणातील कायदेशीर पेचही वाढला आहे. त्यामुळे शिंदे गटातर्फे भाजप व्यतिरिक्त पर्यायांची चाचपणी सुरू करण्यात आली आहे. अशातच एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंना दुसऱ्यांना फोन केल्याचे समोर आले आहे. राजकीय सत्तानाट्यादरम्यान, राज ठाकरेंचं मौन हे शंकेच्या नजरेनं पाहिलं जात आहे. शिवसेनेत फूट पडतेय, मुख्यमंत्री अडचणीत आहेत, शिवसेनेवरील ठाकरेंचा ताबा सुटण्याची शक्यता वर्तविली जात असताना राज ठाकरे शांत कसे? अशा अनेक चर्चांना उधाण आले आहे. मात्र या दोघांमध्ये झालेल्या फोन पे चर्चावरून वेगळंच चित्र सध्या निर्माण झाले आहे.

राजकीय सत्ता नाट्याला कोणतं वळण येणार?

एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यात दोनदा फोनवर बोलणे झाले आहे. यावेळी एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यात महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीबाबतही चर्चा झाल्याचे समजते. मात्र राज्यातील राजकीय घडामोडींवर दोन्ही बड्या नेत्यांमध्ये नेमकं काय बोलणं झालं, कोणतं संभाषण झालं, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. सध्या एकनाथ शिंदे यांच्या गटात तब्बल 40 आमदार आहेत. शिवसेनेच्या एकूण 54 आमदारांपैकी 40 आमदार शिंदे गटात गेल्याने शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले आहे. तर मागील सहा दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय सत्ता नाट्याला कोणतं वळण येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.