मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने शिवसेनेविरोधात बंड केल्याने शिवसेनेतून मोठ्या प्रमाणात गळती सुरू झाली आहे. दरम्यान, शिवसेनेकडून हकालपट्टी देखील करण्यात येत असल्याचे सुरू झाल्याचे दिसतेय. अशातच आता शिवसेनेचे बंडखोर आमदार तानाजी सावंत यांची शिवसेनेच्या सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेनेचे मुखपत्र दैनिक सामनामध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख पदावर अनिल कोकीळ यांची नियुक्ती करण्यात आली असून तानाजी सावंत यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. अनिल कोकीळ यांची नियुक्ती पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशांने करण्यात आली आहे, अशी माहिती देखील या वृत्तात देण्यात आली आहे. त्यामुळे तानाजी सावंत यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.
(हेही वाचा – वारकऱ्यासांठी स्वच्छ, सुविधायुक्त पंढरपूर साकारणार: मुख्यमंत्री शिंदे)
एकनाथ शिंदेकडे हळूहळू संख्याबळ वाढताना दिसत आहे. अशातच ज्यांना जायचे त्यांनी जावे, असा इशारा उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना दिला होता. स्थानिक पातळीवर देखील दोन गट पडले असून सत्ता हवी असणारे शिंदेंच्या बाजूने जात असल्याचे दिसून येत आहे. केवळ आमदारच नाही तर पक्षात विविध जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये देखील चलबिचल पाहायला मिळत आहे. दरम्यान, एकनाथ शिंदेंना सहकार्य करणाऱ्या नेते आणि कार्यकर्त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय आता शिवसेनेकडून घेण्यात येत असल्याचे पाहायला मिळत आहे.
Join Our WhatsApp Community