दोन दिवसांत झाली शिवसेनेला राणेंची ओळख

तीन दिवसांपूर्वी ज्यांना राणे माहीत नव्हते, ते आता चौकाचौकांमध्ये राणेंच्या विरोधात घोषणा करताना दिसत आहेत.

195

तीन दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याबाबत कोण नारायण राणे? मला माहीत नाही, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांसमोर विधान केले होते. परंतु अवघ्या दोन दिवसांमध्येच शिवसेनेला राणेंची ओळख झाली. राणे यांच्या जुहूमधील घरासमोरील आंदोलनासह संपूर्ण मुंबईतील विभागांमध्ये शिवसेनेच्यावतीने आंदोलन करत त्यांचा निषेध करण्यात आला. त्यामुळे तीन दिवसांपूर्वी ज्यांना राणे माहीत नव्हते, ते आता चौकाचौकांमध्ये राणेंच्या विरोधात घोषणा करताना दिसत असल्याने, राणेंनी दोन-तीन दिवसांतच आपली ओळख शिवसेनेला करुन दिली असल्याचे या घटनांवरुन दिसून आले आहे.

काय म्हणाले राऊत?

भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज पार्कवरील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर भेट दिल्यानंतर, शिवसैनिकांनी त्या स्मृतीस्थळावर दुग्धाभिषेक करुन त्याचे शुध्दीकरण केले होते. त्यानंतर प्रसार माध्यमांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना विचारले असता, कोण नारायण राणे? मला माहीत नाहीत. राणे हा आमचासाठी अतिशय स्थानिक विषय आहे, असे त्यांनी सांगितले. यावर राणे यांनी प्रत्युतर देताना, मी जवळ बोलवेन आणि ओळख करुन देईन, असे म्हटले होते.

(हेही वाचाः पोलिसांनी राणेंना भरल्या ताटावरुन उठवले)

अशी झाली ओळख

दोन ते तीन दिवसांमध्येच नारायण राणे यांनी आपली ओळख आणि पत्ता शिवसेनेला दाखवून दिला. राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर टीका केल्यानंतर युवा सेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या कार्यकर्त्यांनी जुहूमधील त्यांच्या निवासस्थानी हल्ला करत तीव्र आंदोलन केले. त्यानंतर मुंबईतील सर्व विभागांमध्ये शिवसेनेच्या विभागप्रमुखांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करत राणेंचा निषेध केला. एवढेच नव्हे तर शिवसेनेने त्यांना अटक करुन आपल्या सत्तेची ताकदही दाखवून दिली.

शिवसेनेला घ्यावी लागली दखल

त्यामुळे ज्या राणेंना ओळखत नाही असे म्हणत शिवसेनेने त्यांना दुलर्क्षित केले होते, त्यांच्याकडे लक्ष न देण्याचा निर्णय घेतला होता, त्याच राणेंची दखल शिवसेनेला घ्यावी लागली आहे. राणेंना अटक होईपर्यंत त्यांचा निषेध व्यक्त करणारे शिवसेनेचे कार्यकर्ते त्यांच्या अटकेनंतर ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करू लागले आहेत. या आंदोलनातून शिवसेनेने पुन्हा एकदा जनतेला राणे यांची ओळख दाखवून दिली. ज्या राणेंना शिवसेना ओळखत नव्हती, त्याच शिवसेनेला राणेंची ओळख या राज्याला आणि अख्ख्या देशाला करुन दिली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राणे शिवसेनेच्या आंदोलनामुळे मोठे झालेले पहायला मिळाले आहे.

(हेही वाचाः राणेंच्या विधानाचे समर्थन नाही, पण… काय म्हणाले फडणवीस?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.