राज्यात महाविकास आघाडी सरकार अस्थिर होत असल्याची चर्चा सुरू असतानाच, आता पावसाळी अधिवेशनासाठी शिवसेनेने विशेष काळजी घेतली आहे. पावसाळी अधिवेशन संपेपर्यंत आमदारांनी सभागृहात उपस्थित राहावे, असा व्हिप शिवसेनेच्या सर्व आमदारांना जारी करण्यात आला आहे.
राज्याचे पावसाळी अधिवेशन 5 आणि 6 जुलै रोजी होत आहे. त्याचमुळे या अधिवेशनात संपूर्ण दिवस उपस्थित राहण्याचे आदेश पक्षाकडून देण्यात आले आहेत.
म्हणून शिवसेना आमदारांना व्हिप जारी
अधिवेशनात पुरवणी मागण्या, शासकीय कामकाज आणि पुरवणी विनियोजन विधेयके यावर चर्चा मतदान करुन मंजूर करण्यात येणार आहे. त्यामुळे शिवसेनेच्या सर्व आमदारांनी संपूर्ण अधिवेशन पूर्ण दिवस उपस्थित राहिले पाहिजे, असा पक्षादेश शिवसेनेने काढला आहे. शिवसेनेचे प्रतोद आमदार सुनील प्रभू यांनी शिवसेना विधिमंडळ पक्षनेते कार्यालय या पत्राद्वारे शिवसेनेच्या आमदारांना व्हिप जारी केला आहे.
(हेही वाचाः दोन दिवसांचे अधिवेशन कोरोनासाठी की बचावासाठी?)
असे होणार कामकाज
अधिवेशनात पहिल्या दिवशी शोक प्रस्ताव आणि पुरवणी मागण्या मांडल्या जातील आणि दुसऱ्या दिवशी विनियोजन विधेयक मांडून पुरवणी मागण्यांना मंजुरी दिली जाईल. कोविड काळात सर्वाधिक खर्च हा आरोग्यावर होतो, अन्य खात्यांना निधी वितरित झाले नाहीत. ३० टक्क्यांच्या वर निधी खर्च करू नयेत असे शासनाचे आदेश आहेत. त्यामुळे पगार, स्कॉलरशीप आणि पेन्शन, आरोग्य या व्यतिरिक्त विकास कामे कोणतीही होत नाहीत. त्यामुळे पुरवणी मागण्यांमध्ये आरोग्यासाठी काय खर्च लागेल तेवढेच मांडले जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
अध्यक्ष निवडीवर काय घेणार निर्णय?
पावसाळी अधिवेशन देखील अध्यक्षांविनाच घ्यायचे, असा मानस राज्य सरकारचा आहे. मात्र काँग्रेसकडून विधानसभा अध्यक्षांची निवड याच अधिवेशनात व्हावी, अशी मागणी करण्यात येत आहे. त्याचमुळे आता विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक लागली तर काय करावे, याची रणनीती देखील महाविकास आघाडी आखत आहे. त्याचमुळे शिवसेनेने हा व्हिप जारी केल्याचे बोलले जात आहे.
(हेही वाचाः पावसाळी अधिवेशनही अध्यक्षाविना होणार?)
Join Our WhatsApp Community