राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा २७ जुलै रोजी वाढदिवस असल्याने राज्यभरातून शिवसैनिकाच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यासह शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्रात बंडखोर आमदारांसह खासदारांनी जाहिराती दिल्या मात्र सामानाने त्या नाकारल्याचे समोर आले आहे. शिंदे समर्थक खासदार राहुल शेवाळे यांनी ही माहिती दिली आहे. बंडखोरांच्या जाहिराती सामनामध्ये नकोत, अशी भूमिका शिवसेनेकडून घेण्यात आली, असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
(हेही वाचा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठाकरेंना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा! म्हणाले ‘मी त्यांना…’)
राहुल शेवाळे काय म्हणाले?
शिंदे समर्थक खासदार राहुल शेवाळे यांनी उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असे म्हटले की, दरवर्षी त्यांचा वाढदिवस आम्ही उत्साहात, आनंदात साजरा करतो, यासह सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करत सामनामध्ये देखील जाहिराती देत असतो, मात्र यंदा आमच्या जाहिराती शिवसेनेकडून नाकारल्या गेल्या. त्या स्विकारल्या नाहीत. असे असले तरी उद्धव ठाकरेंसोबत शुभेच्छा सदैव असतील. यासह ते पुढे असेही म्हणाले की, दरवर्षी सामनात शिवसेना खासदारांकडून उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देणाऱ्या जाहिराती असतात. दरवर्षीप्रमाणे आम्ही यंदाही जाहिराती देण्यासाठी ‘सामना’शी संपर्क साधला. मात्र, यंदा या जाहिराती स्वीकारण्यात आल्या नाहीत. या जाहिराती यंदा नाकारल्या पण त्या न स्विकारण्याचे कोणतेही कारण शिवसेनेकडून आम्हाला सांगण्यात आले नाही.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जाहिराती कमी
उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्रात विशेष पुरवण्या प्रसिद्ध करण्यात येतात. या पुरवणीत शिवसेनेचे सर्व आमदार, खासदार उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देणाऱ्या जाहिराती असतात. पण शिवसेनेत झालेल्या बंडाळीनंतर बंडखोरांच्या जाहिराती सामनाकडून नाकारल्या गेल्या. उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्राने गेल्यावर्षी प्रत्येकी ८ पानांच्या ८ पुरवण्या छापल्या होत्या. मात्र यावेळी त्याची संख्या कमी होत ५ वर आली आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जाहिराती घटल्याचे पहायला मिळाले.
Join Our WhatsApp Community