शिवसेनेच्या संजयला भाजपचा धनंजय पडणार भारी, फडणवीसांनी सांगितला ‘मास्टर प्लॅन’

131

राज्यात राज्यसभा निवडणुकीसाठी चांगलीच वातावरण निर्मिती झाली आहे. येत्या 10 जून रोजी होणा-या या निवडणुकीत शिवसेनेचे संजय पवार विरुद्ध भाजपचे धनंजय महाडिक यांच्यात चुरशीचा सामना रंगणार असल्याचे बोलले जात आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपची कार्यकारिणी बैठक पार पडली. शिवसेनेच्या संजयचा या निवडणुकीत पराभव होणार असून, त्यासाठी भाजपकडून रणनीती आखण्यात आल्याची माहिती बैठकीनंतर भाजप आमदार आशिष शेलार यांनी दिली आहे.

या निवडणुकीत धनंजय महाडिक यांना निवडून आणण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी एक मास्टर प्लॅन आखला असल्याचेही शेलार म्हणाले.

(हेही वाचाः कोरोना झाल्याने फडणवीसांना राज्यसभा निवडणुकीत मतदान करता येणार का?)

संजयना असमान दाखवणार

केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत राज्यसभा निवडणुकीबाबत भाजपची बैठक रविवारी पार पडली. या बैठकीला देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाईन हजेरी लावली. यावेळी राज्यसभा निवडणुकीबाबत व्यूहरचना आखण्यात आल्याची माहिती शेलार यांनी दिली आहे. तसेच ठरल्याप्रमाणे भाजपचे तिसरे उमेदवार हेच या निवडणुकीत जिंकून येणार असून, शिवसेनेच्या संजय पवारांना ते असमान दाखवणार असल्याचा विश्वास शेलार यांनी व्यक्त केला आहे. यासाठी सर्व आमदारांची जुळवाजुळव भाजपकडून करण्यात आली असल्याचेही शेलार यांनी स्पष्ट केले आहे.

(हेही वाचाः राज्यसभेचा आखाडा कोल्हापूरच्या ‘मल्लांमुळे’ गाजणार! कोण कोणाला ‘असमान’ दाखवणार?)

राऊतांना पराभव दिसतोय…

आपल्या पक्षांच्या आमदारांना नजरकैदेत ठेवण्याची वेळ महाविकास आघाडीमधील पक्षांवर का यावी?, यावरुनच त्यांचा आपल्या आमदारांवर विश्वास नसल्याचे स्पष्ट होत आहे, अशी टीकाही शेलार यांनी केली आहे. तसेच निवडणूक जिंकण्यासाठी भाजपकडून केंद्रीय यंत्रणांचा वापर होत असल्याचे आरोप संजय राऊत यांच्याकडून करण्यात येत आहेत. हे सर्व आरोप बालिश, खोटे आणि पोरकटपणे करण्यात आले असल्याचे शेलार यांनी म्हटले आहे. आपला पराभव त्यांना दिसत असल्यामुळे कदाचित त्यांच्याकडून आधीच कारणं देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा टोलाही शेलारांनी राऊतांना लगावला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.