“हा एक राजकीय अजेंडा…”, राऊतांचा मोदींवर घणाघात

136

देशात सध्या प्रत्येकाच्या तोंडात एकाच चित्रपटाचे नाव आहे, तो चित्रपट म्हणजे ‘द काश्मीर फाईल्स’. या चित्रपटाची जोरदार चर्चा असली तरी यावरून वाद देखील निर्माण झाले आहेत. दरम्यान, भारतीय जनता पक्षाची संसदीय बैठक मंगळवारी झाली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘द काश्मीर फाईल्स’ सिनेमावर पहिली प्रतिक्रिया दिली असून यावेळी ते म्हणाले, सत्य दडपण्याचा प्रयत्न केला गेला असे म्हटले आणि या चित्रपटासह संपूर्ण टीमचे कौतुकही केले. यावरच शिवसेनेचे नेते खासदार, संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. यावेळी ते म्हणाले, देशाचं राजकारण हे पक्षांच्या दबावाखाली केले जातं आहे. पंतप्रधान मोदी हे द काश्मीर फाईल्स या चित्रपटाचे स्टार प्रचारक आहेत, असा घणाघातही त्यांनी केला.

(हेही वाचा – ‘द काश्मीर फाईल्स’वर पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?)

काश्मीर फाईल्सचे मोदी हे सर्वात मोठे प्रचारक आहेत. हा एक राजकीय अजेंडा राबवला जात आहे. काश्मीरी पंडितांची वेदना देशात बाळासाहेब ठाकरे यांच्या इतकी कुणाला माहीत नसेल, असे दिल्लीत राऊत म्हणाले.

काय म्हणाले राऊत?

काश्मीरची वेदना जेवढी शिवसेनेला माहीत आहे, तेवढी अन्य कुणाला माहीत असेल मला वाटत नाही. काश्मिरातील प्रश्नावर आणि काश्मिरी पंडितांच्या वेदनेवर सातत्याने आवाज उठवणारे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे त्या काळातील एकमेव नेते होते. ते केवळ आवाज उठवून थांबले नाहीत तर महाराष्ट्रात युतीचं सरकार आलं आणि काश्मीर पंडितांचं शिष्टमंडळ जेव्हा त्यांना भेटायला आलं तेव्हा काश्मिरी पंडितांची अस्वस्थता त्यांनी पाहिली. तत्कालीन परिस्थिती पाहून काश्मिरी पंडितांच्या हातात शस्त्र द्या, ही बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका होती.

मग आता का रडताय, चौकशीला सामोरे जा

महाराष्ट्रात काश्मिरी पंडितांच्या मुलांसाठी ५ टक्के जागा राखीव ठेवत विस्थापित कश्मीरी पंडितांच्या मुलांसाठी कायदा करून घेणारं महाराष्ट्र पहिलं राज्य होतं. त्याकाळी काश्मीरी पंडितांच्या समस्येबाबत बाळासाहेबांनी आवाज उठवला होता, बाकी सगळे गप्प होते. मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत मात्र भाजपने त्यांना एक पक्ष नेते बनवले आहे. भाजपाकडून पक्षांच्या दबावाखाली राजकारण केले जातं आहे. पोलीस खोटे गुन्हे दाखल करत नाहीत. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या चित्रपटाचा वापर केला जात आहे. जेव्हा महाविकास आघाडीतील नेत्यांची चौकशी होते, तेव्हा भाजपला हसायला येतं. मग आता का रडताय, चौकशीला सामोरे जा, असा निशाणाही त्यांनी फडणवीसांना लगावला आहे. या पुढे ते असेही म्हणाले की, राज्यपाल राजकारण करत आहेत. राज्यापालांकडून ही अपेक्षा नाही. राज्यपालांनी वारंवार कायद्याचं उल्लंघन केलं असून राज्यघटनेचाही भंग केला आहे, त्यामुळे अशा व्यक्तीला पदावर राहण्याचा अधिकार नाही.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.