खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा मातोश्रीवर आज शनिवारी हनुमान चालिसा पठण करण्यावर ठाम असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राणा दाम्पत्याला इशारा दिला आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले, आमच्या घरात घुसण्याचा प्रयत्न कराल तर याद राखा. शिवसैनिक स्वतःचे रक्षण करण्यास समर्थ असून शिवसैनिक मारायला आणि मरायला तयार आहे. सरकार आमचं असल्याने पोलिसांचं संरक्षण घेतलं जात असल्याचे वक्तव्य देखील त्यांनी केले.
हे सल्ले एकण्याइतकं भिकारीपण आलेले नाही
यावेळी, संजय राऊतांनी राणा दाम्पत्य आणि त्यांच्या पाठिशी असलेल्या भाजपाला इशारा देखील दिला. ते म्हणाले, कुणाच्या तरी पाठबळाने तुम्ही आमच्या मातोश्रीत घुसण्याचा प्रयत्न करत असाल मुंबईत येऊन तर शिवसैनिक काय स्वस्थ बसतील का? कायदा आणि सुव्यवस्थेच्या गोष्टी आम्हाला सांगू नका. कायदा आणि सुव्यवस्था काय आहे? आणि सरकारने, मुख्यमंत्र्यांनी काय केले पाहिजे? हे सल्ले तुमच्याकडून एकण्याइतकं महाराष्ट्राला भिकारीपण आलेले नाही.
(हेही वाचा – राणा दाम्पत्यांनी शेअर केला व्हिडिओ; म्हणाले,”शिवसैनिकांकडून गुंडगिरी…”)
… तर तुम्हालाही घरं आहेत. हे लक्षात घ्या
पुढे राऊत असेही म्हणाले, तुम्ही आमच्या मातोश्रीत घुसताय, हिंमत नाही घुसण्याची पण बदनाम करताय, कोण तुम्ही ? तुम्ही कोण आहात? तुम्ही तुमच्या लायकीप्रमाणे राहा, तुम्ही जर तुमची लक्ष्मणरेषा ओलांडली, तर मग शिवसैनिकांनाही चिडून तुमच्या घरापर्यंत घुसण्याचा अधिकार आहे. हिंमत असेल तर ईडी, सीबीआय लावा, आम्ही तुम्हाला घाबरत नाही, शिवसैनिकांवर आता कुणाचाही कंट्रोल नाही. अजून काहीच सुरु झालेलं नाही. दोन दिवसांपासून ज्या घटना पाहताय तुम्ही मुंबईत. या फक्त शिवसैनिकांच्या भावनांचा उद्रेक नाही, तर जनतेच्या भावनांचा हा स्फोट आहे. मी सध्या नागपुरात आहे. मी इथून सगळं वातावरण पाहतोय. तुम्ही आमच्या घरात घुसण्याचा प्रयत्न कराल, तर तुम्हालाही घरं आहेत. हे लक्षात घ्या, असेही राऊत म्हणाले.