ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आपल्याला जीवे मारण्याची सुपारी दिल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. यासंदर्भात राऊतांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलिस आयुक्तांना पत्र दिलं आहे. यामुळे राजकारण तापलं आहे. मात्र आता शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी संजय राऊतांचा कांगावा उघड केला आहे. लवकरच संजय राऊतांविरोधात गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती म्हस्के यांनी दिली.
राऊतांचे मानसिक संतुलन बिघडलं
नरेश म्हस्के यांनी पत्रकार परिषद घेऊन संजय राऊतांवर हल्लाबोल केला आहे. नरेश म्हस्के म्हणाले की, ‘संजय राऊतांचा भांडाफोड झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या विरोधात उपद्वाप सुरू आहेत. तुरुंगातून बाहेर आल्यापासून राऊतांचं डोकं फिरलं आहे आणि त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. वाटेल तसे आरोप राऊत मुख्यमंत्र्यांवर करत आहेत. यामुळेच त्यांच्यावर मेंटल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्याची गरज आहे.’
संजय राऊतांच्या जबाबामध्ये नेमकं काय?
‘बुधवारी पोलीस अधिकारी राऊतांकडे जबाब घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी संजय राऊतांनी जबाबामध्ये म्हटलं की, ‘सामना वृत्तसंस्थेतील एका व्यक्तीनं राजा ठाकूर आणि श्रीकांत शिंदे यांच्यात आपल्यावर शाई फेकण्याचा हल्ला करण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती दिली.’ पण सामनातील याच व्यक्तीनं दुसरीकडील जबाबामध्ये म्हटलं की, ‘ठराविक असं कोणत्याही आमदार, खासदार यांचं नाव घेऊन हल्ला करणार असल्याचं सांगितलं नाही. राजा ठाकूर किंवा श्रीकांत शिंदे यांपैकी कोणत्याही व्यक्तीचं नाव घेतलं नाही,’ अशी सविस्तर माहिती म्हस्के यांनी दिली. तसंच संजय राऊतांवर गुन्हा दाखल करणार असल्याचा इशारा म्हस्के यांनी यावेळी दिला.
(हेही वाचा – तुमच्या फालतूगिरीमुळे उद्धव ठाकरे रस्त्यावर; भाजप नेत्याचा राऊतांवर निशाणा)
Join Our WhatsApp Community