पुण्यातील कोविड सेंटरचे कंत्राट एका चहावाल्याला दिल्याचे सांगत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावर घोटाळ्याचे आरोप केले आहे. मुख्यमंत्र्यांवर झालेल्या या आरोपांनंतर शिवसेनेने आपल्या सर्व प्रवक्ते आणि नेत्यांना खडबडून जागे केले. पक्षाने तर यासाठी प्रत्येक प्रवक्त्यांसाठी स्क्रिप्टही लिहून दिली. त्यानंतर चाय पे चर्चा करत सर्व प्रवक्ते गल्लीपासून ते थेट दिल्ली गाठत सोमय्यांवर तुटून पडले. मात्र, सोमय्यांच्या हे आरोप गंभीरतेने घेत नाही, असे सांगणाऱ्या प्रवक्त्यांची फौजच मुख्यमंत्र्यांच्या पाठराखणीसाठी तैनात करण्यात आल्याचे पहायला मिळाले आहे.
(हेही वाचा- असा जातोय ‘लालपरी’चा पैसा खासगी चालक-वाहकांच्या खिशात!)
सोमय्या यांनी पुण्यातील कोविड सेंटरचे कंत्राट चहावाल्याला दिल्याचा आरोप केला आहे. याचा समाचारही शिवसेनेच्या प्रवक्त्यांनी घेतला असून देशाचे पंतप्रधानपद चहावाला भूषवत असेल तर चहावाला कोविड सेंटरचे काम का घेऊ शकत नाही असा सवाल त्यांनी केला. उलट अशाप्रकारचा आरोप करत सोमय्या यांनी चहा विकणाऱ्यांविरोधात अविश्वास दाखवला असल्याचे या सर्वांनी म्हटले आहे.
काय म्हणाले प्रवक्ते वाचाच…
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी ज्या संयमाने कोविडची परिस्थिती हाताळली, त्याबाबत त्यांचे कौतूक सर्वच स्तरावर होत आहे. सर्वोच्च न्यायालयानेही याचे कौतुक केले आहे. यामुळेच याची मळमळ किरीट सोमय्यांच्या पोटात होत असेल, भाजप सोमय्यांच्या बेताल वक्तव्यामुळे त्यांना जो काही नवीन रोग मळमळ, जळजळ आणि पोटदुखीचा झाला आहे, याकरता सेंटर उभारुन उपचार करण्यात यावे. चहावाल्याला कोविड सेंटर दिल्याचे म्हटले आहे, या देशाच्या पंतप्रधानानेही चहा विकलेला आहे. आता हा विकला किंवा नाही याची चौकशी सोमय्यांना करायची तर नसेल ना!
– शिवसेना प्रवक्ते, किरण कान्हेरे
पुण्यातील कोविड सेंटरवरून भाजपचे स्टंटबाज नेते किरीट सोमय्या यांनी एक वादळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला, पण त्यामध्ये ते सपशेल आपटले. त्यांचा मुद्दा काय पादर्शकता नाही. पण राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जे काही काम केले ते सर्वश्रुतच आहे, त्यांचे कौतुकच होत आहे, सर्वोच्च न्यायलायानेही कौतूक केले आहे. तरीही सतत पोटदुखी, मळमळ होते, डोकेदुखी होते, एवढेच नाही तर त्यांचे मानसिक संतुलन बिघडलेय. त्यामुळे या नेत्याला कृपाकरून या कोविड सेंटरमध्ये भरती करावे आणि त्यांच्यावर इलाज करावा. शारीरीक इलाज नाही तर मानसिक इलाजही करण्याची गरज आहे. सोमय्यांना, चहावाल्याबद्दल आक्षेप असवा, या देशाचे पंतप्रधान कधी काळी चहा विकत होते, यांच्यावर त्यांचा आक्षेप आहे का?
– शिवसेना आमदार, प्रवक्त्या- मनिषा कायंदे
अखंड महाराष्ट्रभर कोविड सुविधांची उभारणी आणि याबाबतच्या पारदर्शक कारभाराची दखल सर्वोच्च न्यायालयाने घेत, मुख्यमंत्र्यांना शाबासकी दिली आहे, नेमका याचा पोटशुळ उठल्यानेच किरीट सोमय्यांनी बेलगाम आरोप केले आहे. चहा विकणाऱ्याला कंत्राट दिले, असा आरोप केला गेला. चहा विकणाऱ्याला कोविड चालवण्याचे कंत्राट दिले की नाही हे सत्य नक्कीच समोर येईल, परंतु ज्या वेळेला चहा विकणाऱ्यावर आरोप होतो, तेव्हा भारतात जनतेच्या मनात प्रश्न आहे, अशा चहा विकणाऱ्यांची लायकी नाही आणि त्यांनी काही करूच नये असे सोमय्यांना वाटते का? मग भारतीयांनी चहा विकणाऱ्याला देश चालववायला दिला ही चूक आहे का याचा विचार पुन्हा व्हायला हवा. यांच्या पोटात जळमळ, पोटदुखी, तळमळ जी काही आहे त्याकरता त्वरीत आमच्या जवळील कोविड सेंटरमध्ये जमा व्हा, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी, यांच्यावर चांगल्यात चांगले उपचार करून घ्यावे.
– शिवसेना प्रवक्त्या – संजना घाडी
मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली कोविडची मात करून लोकांना सेवा दिली ती दिसते,त्याबद्दल जगात प्रसिध्दीही मिळते, कुठेतरी याला गालबोट लावण्यासाठी थातुरमातुरये. यासर्व दिशेला वेगळ्या दिशेला नेण्याचे काम ते करतात, पण हे दुर्दैव आहे, चहावाल्याला कंत्राट दिले असे ते आरोप करतात, पण दिले तर काय झाले? देशाचे पंतप्रधान तर चहाचे बँड अँबेसेडर आहेत. जर अशा गोष्टींवर कुणी राजकारण करत आरोप केले जातात ते टिकणारे नाहीत. हिंमत असेल यासर्व गोष्टीकरून न्यायालयात जावे, परंतु राजकारण करू नरत असतील, मला वाटते जनता त्यांना योग्य वेळी योग्य दिशा दाखवेल.
– शिवसेना उपनेते, सचिन अहिर
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कोविड काळात जे उत्तम काम केले, यासंदर्भात डब्ल्यू एचओने संपूर्ण देशात त्यांचे कौतूक केले आहे. बेस्ट फाईव्हमध्ये उध्दवींचे नाव पुढे आले, देशभर ते गाजले, परंतु महाराष्ट्रातील तथाकथित नेते सोमय्यांना ते पचनी पडलेले नाही. यांना अजूनही त्रास होतोय. बेताल वक्तव्य करत शिवसेनेवर आरोप करणे हे मला वाटते त्यांचे नेहमीचे काम झालंय. सोमय्या जागे व्हा!, आणि महाराष्ट्र सरकार उत्तम काम करते ते बघा, ज्यांनी पिवळा चश्मा लावला, त्यांना संपूर्ण जग पिवळे दिसते, तुम्हाला शिवसेना द्वेषाची काविळ झाली आहे, रोज उठून प्रत्येक नेत्यांवर आरोप करत आहेत त्यामुळे सोमय्यांना चांगल्या रुग्णालयात दाखवून उपचार करणे आवश्यक आहे, खरं तर चहावाल्याला कंत्राट दिलंय, ते दिलंय की न ही याची चौकशी होईलच. पण, चहा विकणाऱ्यांनी दुसरे काही काम करू नये असे सोमय्यांची अपेक्षा आहे का? कारण भारताचे राज्य हे चालवणारे पंतप्रधान हे चहा विकायचे, यावर तुमचा आक्षेप आहेक. त्यामुळे तुम्ही बरे व्हा, आमच्या शुभेच्छा आपल्यासोबतच आहेत