वैधानिक समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ऑक्टोबर फॉर्म्युला!

181

मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीसह चार वैधानिक समिती अध्यक्षपदासाठी शिवसेना, काँग्रेस आणि भाजपच्या सदस्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यामुळे पुन्हा एकदा तिरंगी लढत या निवडणुकीत दिसून येत असली तरी  ऑक्टोबरमध्ये झालेल्या वैधानिक समित्यांच्या निवडणुकांची पुनरावृत्ती पुन्हा होण्याची शक्यता आहे. प्रत्यक्षदर्शी सेनेला अडचणीत आणण्यासाठी हे उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे चित्र रंगवले जात असले तरीही ऑक्टोबरमध्ये ज्याप्रमाणे काँग्रेस पक्षाने माघार घेतली होती, तशीच माघार घेण्याची शक्यता असून जरी माघार घेतला नाही, तरी राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या बळावर शिवसेनेचे पारडे जड आहे. त्यामुळे कोणताही करिष्मा दिसून येणार नसून ऑक्टोबरमध्ये झालेल्या निवडणुकांप्रमाणे पुन्हा एकदा चित्र दिसून येणार आहे.

कोणत्या समित्यांसाठी कोण उभे आहेत?

मुंबई महानगरपालिकेच्या सन २०२१-२२ च्‍या स्‍थायी समिती अध्यक्ष पदासाठी शिवसेनेच्यावतीने विद्यमान अध्यक्ष यशवंत जाधव, काँग्रेसच्या वतीने आसिफ झकेरिया तर भाजपच्या वतीने राजेश्री शिरवडकर, तर शिक्षण समिती अध्यक्ष पदासाठी शिवसेनेच्यावतीने विद्यमान अध्यक्षा संध्‍या दोशी, काँग्रेसच्यावतीने आशा कोपरकर, भाजपच्या वतीने पंकज यादव यांनी आणि सुधार समिती अध्यक्ष पदासाठी शिवसेनेच्यावतीने विद्यमान अध्यक्ष सदानंद (सदा) परब, काँग्रेसच्यावतीने अश्रफ आजमी व भाजपच्या वतीने स्‍वप्‍ना म्‍हात्रे यांनी आपले अर्ज महानगरपालिका सचिव  संगीता शर्मा यांच्‍याकडे गुरुवारी सादर केले. तर बेस्ट समिती अध्यक्ष प्रवीण शिंदे यांना त्यांच्या विनंतीनुसार पुन्हा संधी न देता अनुभवी आणि माजी बेस्ट समिती अध्यक्ष आशिष चेंबूरकर यांना उमेदवारी दिली आहे. चेंबूरकर यांच्या विरोधात काँग्रेसच्या वतीने विरोधी पक्षनेते रवी राजा, आणि भाजपच्या वतीने प्रकाश गंगाधरे यांनी उमेदवारी अर्ज बेस्ट सचिवांकडे सादर केला.

(हेही वाचा : मुंबईत रुग्णवाढीचा उच्चांक : दिवसभरात ८,६४६ रुग्ण, १८ जणांचा मृत्यू! )

राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्षाच्या पाठिंब्यामुळे सेना मजबूत!

कोविडमुळे सन २०२०-२१ च्या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. या निवडणुका ऑक्टोबर २०२० मध्ये पार पडल्या होत्या. या निवडणुकीत आताप्रमाणेच शिवसेना, काँग्रेस आणि भाजपच्या सदस्यांनी उमेदवारी अर्ज भरले होते. पण या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेत शिवसेना उमेदवाराला मदत केली होती.  त्यामुळे भाजपचे मनसुबे उधळले गेले आणि सेनेचे उमेदवार बहुमताने निवडून आले. याच ऑक्टोबर निवडणुकीची पुनरावृत्ती पुन्हा ५ एप्रिलपासून निवडून येणाऱ्या निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसने उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार आपला अर्ज मागे घेतील. एक दबाव निर्माण करण्यासाठी काँग्रेसचा प्रयत्न असून मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी जरी अर्ज मागे घेण्यास नकार दिला, तरीही शिवसेना सुरक्षित झोनमध्ये आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने उघड पाठिंबा दिला असून समाजवादी पक्षाचाही पाठिंबा सेनेला आहे. तर दुसरीकडे भाजपचे भालचंद्र शिरसाट यांना मतदानाचा अधिकार नाही. त्यामुळे काँग्रेसने उमेदवारी अर्ज कायम राखल्यास शिवसेनेच्या उमेदवारांपुढे कोणत्याही अडचणी निर्माण होत नाही, तसेच त्यांना धोकाही नसल्याचे दिसून येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.