महापालिका निवडणूक जवळ येताच शिवसेनेला आठवला ‘मराठी’ माणूस

परप्रांतियांच्या मागे धावताना मराठी माणसाच्या मतांची किंमत कळल्याने, शिवसेनेला मराठीची आठवण झाल्याचे बोलले जात आहे.

मागील काही काळापासून परप्रांतियांच्या मागे धावणाऱ्या शिवसेनेला, पुन्हा एकदा मराठी माणूस आठवू लागला आहे. आजवर मराठी माणसाला विसरलेल्या शिवसेनेला महापालिकेची निवडणूक जवळ येताच मराठी माणसाची आठवण झाली आहे. महापालिकेची निवडणूक मराठी माणसांशिवाय लढता येणार नाही. परंतु परप्रांतियांची मतेही तेवढीच महत्वाची आहेत. त्यामुळे परप्रांतियांच्या मागे धावताना मराठी माणसाच्या मतांची किंमत कळल्याने, शिवसेनेला मराठीची आठवण झाल्याचे बोलले जात आहे.

वर्धापन दिनी मराठीचा सूर

राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पक्षाच्या वर्धापन दिनी मुख्यमंत्रीपदाची वस्त्रे बाजूला ठेवत पक्षप्रमुख म्हणून शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. पण हे मार्गदर्शन करताना पुन्हा एकदा मराठी माणसाकडे ते वळले. भाषणात उध्दव ठाकरे यांनी ज्यावेळी शिवसेनेची स्थापना झाली तेव्हा मराठी माणूस शुल्लक होता. मान सोडाच, अपमान सहन करत होता. शिवसेना तेव्हा स्थापन झाली नसती तर मराठी माणूस दिसला नसता, असे सांगत त्यांनी मराठी माणसाला त्यांच्या अस्तित्वाची आठवण करुन दिली. मराठी माणसाला शिवसेनाप्रमुखांनी तुझ्या मनगटात ताकद आहे तलवार पेलण्याची, ही जाणीव करुन दिली, तेव्हा मराठी माणूस पेटला… अशी आठवणही त्यांनी करुन दिली. हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व! सर्वप्रथम देशाभिमान आणि प्रादेशिक अस्मिता असे सांगत उध्दव ठाकरे यांनी देशात हिंदुत्व आणि राज्यात मराठी माणूस असेच स्पष्ट केले. दोनच दिवसांपूर्वी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी देशात हिंदुत्व आणि राज्यात मराठी मुद्दा, ही शिवसेनेची भूमिका असल्याचे स्पष्ट केले होते.

(हेही वाचाः मुख्यमंत्र्यांनी ‘पाळले’, उपमुख्यमंत्र्यांनी ‘तोडले’! मग कोरोनाचे ‘फावले’ तर…?)

परप्रांतियांना आकर्षित करण्याचा प्रयत्न

विशेष म्हणजे शिवसेनेचा पाया हा मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांच्या मुद्द्यावर मजबूत असला, तरी मागील काही वर्षांमध्ये शिवसेनेने मराठी मुद्दा बाजूला ठेवत राष्ट्रीय पक्षाच्या दृष्टीकोनातून विचार करत हिंदुत्वाची वस्त्रे परिधान केली होती. त्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी परप्रांतियांना कुरवाळण्यासाठी ‘मी मुंबईकर’ ही मोहीम राबवली. यामध्ये जो मुंबईत राहतो, तो मुंबईकर… अशी व्याख्या सांगून शिवसेनेने मुंबईतील परप्रांतियांना आपल्याकडे आकर्षित करुन घेतले.

राबवले विवध कार्यक्रम

त्यानंतर शिवसेना भवनमध्ये लाय चना हा कार्यक्रम आयोजित करुन, परप्रांतियांना अधिक जवळ करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मिच्छामी डुक्कडम अशाप्रकारचे संदेश देत, जैन मारवाडी समाजाला आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काही दिवसांपूर्वी जिलेबी फाफडा, उद्धव ठाकरे आपडा असे कार्यक्रम राबवून, भाजपकडे असलेला गुजराती माणूस आपल्याकडे आणण्याचा प्रयत्न शिवसेनेने केला.

(हेही वाचाः सरनाईकांचा ‘पत्र’प्रताप… म्हणाले, शिवसेनेने भाजपशी जुळवून घेतलेले बरे!)

मराठी मतांची मोट बांधण्यासाठी

परप्रांतियांना जवळ करताना मराठी माणसांकडे शिवसेनेचे दुर्लक्ष झाले आणि हा मराठी माणूस मनसेकडे आकर्षित झाला. परंतु मनसेकडे सातत्य नसल्याने पुन्हा या मराठी माणसाला आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न शिवसेनेचा असून, परप्रांतियांबरोबरच मराठी मतांची मोठी मोट बांधून विजयश्री आणण्याची रणनीती आखली जात आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत भरकटलेल्या मराठी माणसाला आपल्याकडे आकर्षित करुन घेण्यासाठी शिवसेनाचा आटापिटा असून, केवळ महापालिका निवडणुकीत ही मते निर्णायक ठरणार असल्याने शिवसेनेला पुन्हा एकदा आपल्या मराठी मतांकडे वळावे लागले आहे.

(हेही वाचाः अखेर शिवसेनेला ‘राजपुत्राकडून’च कार्यालयाचे लोकार्पण करुन घ्यावे लागले!)

बंगालमध्ये प्रादेशिक अस्मिता जपण्याचा प्रयत्न करतानाच दीदींनी आपले स्वबळ सिध्द केले. त्यामुळे शिवसेनेला मराठी माणसांशिवाय स्वबळ सिध्द करता येणाार नसल्याने, परप्रांतियांच्या मागे धावतानाही मराठी मतांचा टक्का जपण्याचा प्रयत्न करावा लागणार, याच भूमिकेमुळे शिवसेनेला पुन्हा एकदा महापालिका निवडणुकसाठी मराठी माणसांची आठवण झालेली दिसून येत असल्याचे बोलले जात आहे.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here