राज्यात सरकार, तरीही शिवसेनेचा जीव मुंबई महापालिकेतच अडकलेला

मुंबई महापालिका ताब्यात घेण्याबाबत शिवसेना अन्य पक्षांशी मोठी तडजोड करण्याच्या तयारीला लागल्याचे बोलले जात आहे.

मुंबई महापालिकेवर कमळ खुलवण्याचा निर्धार करत भाजपने आपली शक्ती पणाला लावलेली आहे. तसेच कोणत्याही परिस्थितीत महापालिकेवरील भगवा कायमच फडकत ठेवण्यासाठी शिवसेनाही कामाला लागली आहे. राज्यात शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेत महाविकास आघाडीचे सरकार बनवले असले, तरी शिवसेनेचा जीव मात्र मुंबई महापालिकेतच अडकला आहे. त्यामुळे शिवसेनेला नामोहरम करायचे असेल तर मुंबई महापालिका भाजपला ताब्यात घ्यावी लागणार असून, प्रसंगी सरकार पडले तरी चालेल पण मुंबई महापालिकेची सत्ता सोडणार नाही अशीच शिवसेनेची भूमिका दिसून येत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये मुंबई महापालिका ताब्यात घेण्याबाबत शिवसेना अन्य पक्षांशी मोठी तडजोड करण्याच्या तयारीला लागल्याचे बोलले जात आहे.

मुंबई महापालिका शिवसेनेचीच

मुंबई महापालिकेत १९८५ पासून शिवसेनेची सत्ता असली तरी त्यानंतर १९९२ मध्ये शिवसेनेच्या ताब्यातून काँग्रेसने महापालिका हिसकावून घेतली होती. परंतु त्यानंतर १९९६-९७ मध्ये फोडाफोडीचे राजकारण करत शिवसेनेने मिलिंद वैद्य यांच्या रुपाने महापौर बसवला. त्यानंतर १९९७ ला झालेल्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेचे सर्वाधिक नगरसेवक पुन्हा निवडून आले आणि पुन्हा एकदा महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकला गेला तो आजही फडकतच आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेसला राज्य तुम्ही घ्या, पण मुंबई महापालिका आम्हाला सोडा याच भूमिकेतून राजकारण केले होते.

(हेही वाचाः महापालिका निवडणुकीपूर्वीच काँग्रेसला कापरे भरले! अतुल भातखळकरांची टीका )

भाजपने घेतली पहारेक-याची भूमिका

२०१७च्या सार्वत्रिक महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजप युती तुटल्यानंतर मुंबईत भाजपने शिवसेनेला कडवे आव्हान देत, आपले ८२ नगरसेवक निवडून आणले, तर अभासे आणि अपक्ष अशा दोन नगरसेवकांचा पाठिंबा मिळवत आपली संख्या ८४ एवढी केली. त्यानंतर अपक्षांची मोट बांधून भाजपला महापालिकेत सत्तेचा दावा करता आला असता. त्यानंतरही मनसेच्या सहा नगरसेवकांचा गट फुटून सर्वप्रथम भाजपकडे गेला होता. त्या गटाला तत्कालीन मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी शिवसेनेकडे पाठवून शिवसेनेची महापालिकेतील सत्ता मजबूत केली. त्यामुळे सध्या मुंबई महापालिकेतील शिवसेनेची सत्ता ही माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मेहेरबानीवरच असून, आमचा पक्ष पहारेकरी म्हणून महापालिकेत जबाबदारी पार पाडेल, असे जाहीर केले. त्यामुळे महापालिकेचा कारभार करताना शिवसेनेला भाजपकडून कोणत्याही प्रकारे अडचण होणार नाही, याची काळजी घेण्यात आली.

भाजप बदल्याच्या तयारीत

परंतु २०१९च्या विधानसभा निवडणुकीत युती केल्यानंतरही शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने राज्यात सरकार स्थापन केले. त्यानंतर भाजपला आपल्याशी दगाफटका झाल्याची जाणीव होऊ लागली. त्यामुळेच याचा बदला घेण्यासाठी भाजपने आपली शक्ती कामाला लावली असून, मुंबईची खरी ओळख असलेल्या मराठी माणसाचा चेहरा हा या निवडणुकीत शिवसेनेविरोधात वापरला जाणार आहे.

(हेही वाचाः महापालिका निवडणुकीच्या तोंडावर कृपाशंकर सिंह यांचा भाजपप्रवेश!)

राणे देणार सेनेला शह?

भाजपचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा असले, तरी मुंबई महापालिकेचे प्रभारी हे अतुल भातखळकर आहेत. त्यातच आशिष शेलार हे सातत्याने मुंबईच्या राजकारणासह राज्याच्या राजकारणात सक्रीय आहेत. मुंबई महापालिकेतील सत्ताधारी पक्ष व प्रशासनावर आशिष शेलार, अतुल भातखळकर, अमित साटम हे सातत्याने आरोप तथा टीका करत शिवसेनेची कोंडी करत आहेत. त्यातच आता माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची केंद्रीय मंत्रीपदी निवड करत भाजपने त्यांची राज्यातील ताकद वाढवली आहे. नारायण राणे हे १९८५ मध्ये याच महापालिकेत चेंबुरमधून नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यानंतर त्यांना बेस्ट समिती अध्यक्ष बनवले. या अध्यक्षपदाच्या कालावधीत त्यांनी बेस्ट उपक्रमाला दिशा देतानाच आपल्या प्रशासकीय कौशल्याचाही वापर केला. त्यानंतर १९९०ला मालवणमधून आमदार बनल्यानंतर पुढे अनेक मंत्रीपदे, मुख्यमंत्री पद, विरोधी पक्षनेते पद, खासदार अशी पदे राणे भूषवत असले, तरी त्यांचा मुंबई महापालिकेचा अभ्यास दांडगा आहे. या अभ्यासाचा आणि अनुभवाचा फायदा करुन घेत एकप्रकारे मुंबई महापालिकेत शिवसेनेला शह देण्याचाही प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.

शिवसेना महापालिका कायम राखणार?

राज्यात सरकार असले तरी मुंबई महापालिका ही सोन्याचे अंडे देणारी कोंबडी असल्याने, कोणत्याही परिस्थितीत महापालिका हातची जाऊ नये यासाठी शिवसेनेनेही चंग बांधला आहे. त्यांनीही आपल्या वेगवेगळ्या रणनीतींचा अवलंब करायला सुरुवात केली आहे. राज्यात सरकार असल्याने शिवसेनेला आपली सर्व ताकद वापरता येणार असली तरी याचा वापर करत शिवसेना महापालिका कायम राखतात की भाजपच्या रणनीतीपुढे कमी पडतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

(हेही वाचाः उत्तर भारतीयांची ‘कृपा’ भाजपवर होणार का?)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here