- खास प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गट आणि शिवसेना उबाठा गटातील खासदार फुटण्याच्या मार्गावर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्याने या दोन्ही गटांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली असून आपापल्या खासदारांची मनधरणी करण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना उबाठा प्रवक्ते संजय राऊत यांनी आपल्या खासदारांना ‘फुटल्यानंतर काय मिळणार?’ असा सवाल करत त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला तर भाजपा नेत्यांवर टीका करून मनातील गरळ ओकली. (Shiv Sena UBT)
खासदार कोटा, केंद्रात मंत्रीपद
बुधवारी ७ जानेवारी २०२५ या दिवशी संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गट आणि शिवसेना उबाठा गटातील खासदार फुटणार असल्याची अप्रत्यक्ष कबुलीच दिली. ते म्हणाले, जोपर्यंत अजित पवार यांच्या ७ खासदारांचा कोटा पूर्ण होत नाही, तोपर्यंत त्यांच्या पक्षाला केंद्रात मंत्रीपद मिळणार नाही, अशी अट भाजपाने घातली आहे, असा आरोप राऊत यांनी केला आणि शरद पवार यांचे खासदार फुटणार असल्याची भीती व्यक्त केली. (Shiv Sena UBT)
(हेही वाचा – Dr. Bhau Daji Lad Museum : इतिहास, वारसा समजण्यासाठी संग्रहालयांची भूमिका मोलाची)
तोंडावर हाडकंच पडणार..
त्यावर शिवसेना उबाठा खासदारही फुटाण्याची शक्यता असल्याचे पत्रकारांनी विचारले असता राऊत म्हणाले की, फुटून जात आहेत त्यांचे भविष्य काय? भाजपा त्यांना काय देणार आहे? पक्ष सोडून जाणाऱ्यांना काय मिळणार आहे? असे प्रश्न उपस्थित करून ‘तुमच्या तोंडावर हाडकंच पडणार आहेत ना, चघळायला?’ अशा शब्दांत फुटणाऱ्यांना रोखण्यासाठी मनधरणी सुरू केली. (Shiv Sena UBT)
गरळ ओकली
राष्ट्रवादी (शप) आणि उबाठाच्या आमदार-खासदारांना फोडण्याचे प्रयत्न झाले तर यात नरेंद्र मोदी, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांचा मुखवटा गळून पडतो आहे, असे म्हणत राऊत यांनी फुटणाऱ्या आमदार-खासदारांचे खापर भाजपावर फोडण्याचा प्रयत्न केला. ‘राजकारणातून तुमच्याही तिरड्या कधीतरी उचलल्या जाणार आहेत हे लक्षात घ्या, तेव्हा तुम्ही काय करणार? दिल्लीमध्ये राक्षस बसलेले आहेत त्यांच्याकडे ईडी, सीबीआय आणि पैसा आहे, त्या भीतीपोटी ही फोडाफोडी सुरू आहे,’ अशा शब्दात राऊत यांनी गरळ ओकली. (Shiv Sena UBT)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community