राजकारणात Shiv Sena UBT एकाकी पडणार?

103
राजकारणात Shiv Sena UBT एकाकी पडणार?
  • सुजित महामुलकर

गेले चार दिवस शिवसेना उबाठा (Shiv Sena UBT) आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. हा वाद वरवर वैचारिक दिसत असला तरी शिवसेना उबाठा शरद पवार यांच्यात निर्माण झालेली कटुता ही दीर्घकाळ राहील अशी चिन्हे आहेत. शिवसेना उबाठाने भाजपा, शिवसेना (शिंदे), अजित पवार राष्ट्रवादी कॉंग्रेस, राज्यातील कॉंग्रेस नेते आणि आता शरद पवार अशा एकामागोमाग एक मोठ्या राजकीय पक्षांशी हाडवैर घेतल्याने शिवसेना sउबाठाच्या विद्यमान नेतृत्वाला त्याची झळ कमी बसली तरी त्यांच्या पुढच्या पिढीला म्हणजेच आदित्य यांच्यासाठी भविष्यात राजकीय प्रवास फारच खडतर होऊ शकतो, असे दिसते.

राज्या-राज्यातील फरक

महाराष्ट्रातील राजकीय विरोधक राजकीय आखाड्यात एकमेकांची उणीदुनी काढताना दिसत असले तरी ते एकमेकांशी वैयक्तिक पातळीवर छान गप्पा मारतात, एकमेकांच्या कौटुंबिक समारंभात सहभागी होतात, घरी स्नेहभोजनासाठी जातात, याबद्दल उत्तर आणि दक्षिण भारतातील नेत्यांना आश्चर्य वाटते. हा राजकीय सुसंस्कृतपणा २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर बदलताना दिसत होता. आता तर शिवसेना उबाठाने सगळ्या मर्यादा पार करत मोठा पल्ला गाठला आहे. भविष्यात कदाचित शिवसेना उबाठा (Shiv Sena UBT) राजकीयदृष्ट्या ‘वंचित’ किंवा एकाकी पडली तर आश्चर्य वाटू नये.

मंगळवारी ११ फेब्रुवारी २०२५ या दिवशी दिल्लीतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात एकनाथ शिंदे यांना शरद पवारांच्या हस्ते ‘महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी पवारांनी एकनाथ शिंदेंचं कौतुकही केलं. एकनाथ शिंदे यांच्यामुळे ठाण्याचं राजकारण योग्य दिशेने गेल्याचं पवार म्हणाले. हा सगळा प्रकार शिवसेना उबाठा नेतृत्वाच्या जिव्हारी लागला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीत असा प्रकार घडला असता तर त्यांनी शरद पवार यांच्यावर कदाचित मिश्किल टिप्पणी करत प्रतिक्रिया दिली असती. पण शिवसेना उबाठाने (Shiv Sena UBT) पवारांवर जहरी टीका करत आपल्याच पक्षाच्या एखाद्या ज्येष्ठ खासदाराला सल्ला दिल्याच्या आविर्भावात ‘पवारांनी त्या कार्यक्रमाला जायला नको होते’ अशी अपेक्षा शिवसेना उबाठा प्रवक्ते संजय राऊत यांनी व्यक्त केली. तर दुसऱ्या राऊतांनी (विनायक) पवार यांच्याकडून ‘विश्वासघात’ झाला इथपर्यंत पवारांवर टीका केली.

(हेही वाचा – New Delhi Railway Station Stampede : ‘रेल्वेची ती एक सूचना आणि…’ ; हमालाने सांगितलं नेमकं काय घडलं?)

जहरी टीका

याउपरही शरद पवार यांच्या राष्ट्रवादी गटाच्या नेत्यांकडून पवार यांच्या समर्थनार्थ विधाने आली पण त्यांनी संजय राऊत किंवा शिवसेना उबाठावर (Shiv Sena UBT) थेट टीका करणे त्यांनी टाळले. शिवसेना उबाठाकडून मात्र पवार यांच्यावर शाब्दिक ‘बॉम्बगोळे’ सुरूच ठेवले गेले. “ही माझी आणि आमच्या पक्षाची भूमिका आहे. आमच्यात दम आहे, आम्ही घबरात नाही कारण आम्ही दलाली केली नाही,” असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

ही सगळी भाषा आणि वक्तव्ये पाहता उद्धव ठाकरे यांचा या भूमिकेला पाठींबा आहे, हे उघड आहे. राजकारणात एकमेकांवर टीका केली जाते, त्याला प्रत्युत्तरही दिले जाते. पण महाराष्ट्राच्या इतिहासात राजकारणापलिकडचे संबंध जपणारे नेते होऊन गेले. उबाठा गटाची (Shiv Sena UBT) टीका ही जहरी आणि वैफल्यग्रस्त मानसिकतेचे लक्षण असल्याचे दिसून येते.

गद्दार, बापचोर, पक्षचोर

एकनाथ शिंदे यांनी शिवसनेत जुलै २०२२ मध्ये बंड केले आणि बाहेर पडले. तेव्हापासून शिवसेना उबाठाकडून (Shiv Sena UBT) गद्दार, मिंधे, बापचोर, पक्षचोर अशी टीका प्रत्येक भाषणात होत आहे. शरद पवार यांच्या पक्षातही अजित पवार यांच्याकडून असेच बंड झाले, त्यांनीही पक्षावर ताबा मिळवला. पण उबाठाप्रमाणे शरद पवार यांच्याकडून कधी आदळआपट झाल्याचे पाहावयास मिळाले नाही. आदित्य ठाकरे गुरुवारी १३ फेब्रुवारी या दिवशी नवी दिल्लीत होते. पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला त्यातही त्यांनी गद्दार, बापचोर, पक्षचोर हे पालुपद, सातत्य, सुरूच ठेवले.

मुद्दा हा भाजपा नेते, एकनाथ शिंदे की शरद पवार नाही, तर अशा प्रकारची टोकाची टीका केल्याने शिवसेना उबाठा (Shiv Sena UBT) आणि अन्य राजकीय पक्षांमध्ये एक अदृश्य दुरावा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भले उद्या शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे सख्य झाले आणि ते पुन्हा एकत्र जरी आले तरी दोघांच्या मनात एकप्रकारचे शल्य कायम राहील. शिवसेना उबाठाच्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट घडल्यास ते कोणत्या थराला जाऊ शकतात यांचा धडा राष्ट्रवादीच (शप) नव्हे तर सगळ्याच राजकीय पक्षांनी एव्हाना घेतला असावा.

(हेही वाचा – आता तिकीट, कॅब, हॉटेल सर्व काही एकाच अॅपवर बुक करता येणार ; कधीपासून वापरता येईल SwaRail अॅप)

महायुतीत घेऊ, अशी परिस्थिती नाही

गेल्या काही वर्षात उद्धव ठाकरे यांचे भाजपाशी वर्षानुवर्षे असलेले संबंध बिघडले. एक सुसंस्कृत नेता अशी ओळख असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेले चांगले ऋणानुबंध कमकुवत झाले. फडणवीस यांनी नुकतेच दैनिक ‘लोकसत्ता’च्या एका कार्यक्रमात ‘उद्धव ठाकरे यांच्याशी असलेले संबंध खूप खराब नाहीत पण आता काही आम्ही जवळ येतोय आणि त्यांना महायुतीत घेणार, अशी परिस्थिती नाही’, असे स्पष्टच सांगून टाकले. यावरून उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांच्या राजकीय संबंधांबाबत अंदाज बांधणे कठीण नाही.

…तेव्हा उशीर झालेला असेल

एकीकडे दिवसागणिक पक्षाची सुरू असलेली वाताहत, दिल्ली विधानसभेनंतर कॉंग्रेसवरील टीका, कॉंग्रेसच्या राज्य पातळीवरील नेत्यांचे जाहीर वाभाडे, पक्षाची घसरत चाललेली विश्वासार्हता या पार्श्वभूमीवर, राज्यातील सध्याच्या राजकारणातील दोन महत्त्वाचे नेते देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्याशी केवळ ‘औपचारिक’ संबंध ठेवणे भविष्यात आदित्य ठाकरे यांच्या राजकीय भवितव्यात ‘स्पीड ब्रेकर’चे काम करू शकेल. सुदैवाने प्रबोधनकार आणि त्यानंतर बाळासाहेब ठाकरे असा वारसा लाभलेल्या पुढच्या पिढीकडून जनतेच्या काही अपेक्षा असतात, त्या अपेक्षांना रोज नवे तडे जात असल्याचे प्रकार घडत आहेत, याची जाणीव या नेत्यांना होईल तेव्हा कदाचित उशीर झालेला असेल!

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.