पृथ्वीराज चव्हाण… राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते. पण याच पृथ्वीराज चव्हाण यांना विधानसभा अध्यक्षपद नको रे बाबा, अशी भूमिका राष्ट्रावादी काँग्रेसची आहे. पण असे असतानाच आता शिवसेनेला मात्र विधानसभा अध्यक्षपदी पृथ्वीराज चव्हाण हवे आहेत. काँग्रेसकडून सध्या संग्राम थोपटे पृथ्वीराज चव्हाण आणि नितीन राऊत यांच्या नावांची चर्चा अध्यक्षपदासाठी सुरू असतानाच, आता शिवसेनेने या नावांपैकी पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाला पसंती दिल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे ज्या पृथ्वीराज बाबांच्या नावाला राष्ट्रवादी आणि खासकरुन शरद पवार यांचा विरोध आहे, त्याच बाबांच्या नावाला पसंती देत शिवसेना कोणती राजकीय खेळी खेळू पाहत आहे, असा सवाल मात्र या निमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे.
म्हणून शिवसेनेला हवेत चव्हाण
पृथ्वीराज चव्हाण हे राज्याचे माजी मुख्यमंत्री असून, त्यांना प्रशासनाचा प्रदीर्घ अनुभव आहे. एवढेच नाही तर स्वच्छ प्रतिमा अशी त्यांची ओळख आहे. त्याचमुळे एक स्वच्छ प्रतिमा आणि अभ्यासू व्यक्ती विधानसभेचा अध्यक्ष व्हावा, अशी शिवसेना आणि खासकरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भूमिका आहे. एवढेच नाही तर सत्तेत डोईजड झालेल्या राष्ट्रवादीला देखील यामुळे लगाम बसू शकतो. याचमुळे शिवसेनेने पृथ्वीराज चव्हाण यांच्याच नावाला सर्वाधिक पसंती दिल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळत आहे.
(हेही वाचाः ‘नानां’ना हवे मंत्रीपद, नितीन राऊतांची पडणार विकेट? विधानसभा अध्यक्ष होणार?)
थोपटे-राऊतांपेक्षा पृथ्वीराज उजवे
पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबतच सध्या ऊर्जा मंत्री नितीन राऊत आणि संग्राम थोपटे यांचे नाव चर्चेत आहे. मात्र या दोन्ही नावांना शिवसेनेची पसंती नसल्याची देखील माहिती मिळत आहे. संग्राम थोपटे विधानसभा अध्यक्ष झाले, तर ते विरोधात आक्रमक असलेल्या भाजपला किती नियंत्रणात ठेवू शकतील, याबाबत शिवसेना अजूनही संभ्रमात आहे. तर नितीन राऊत हे सध्या भाजपच्या रडारवर असल्याने, या दोघांपेक्षा स्वच्छ प्रतिमा असेलेले पृथ्वीराज चव्हाण विधानसभा अध्यक्ष व्हावे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाटत आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे शिवसेना-काँग्रेस या दोन्ही पक्षांनी व्हिप बजावला असला, तरी राष्ट्रवादीने मात्र अजून त्यांच्या आमदारांना व्हिप बजावलेला नाही. जोवर काँग्रेस राष्ट्रवादीच्या मर्जीतला उमेदवार देत नाही तोवर राष्ट्रवादी व्हिप बजावणार नाही, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळत आहे.
(हेही वाचाः काँग्रेसकडून शिवसेनेला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न सुरु!)
पृथ्वीराज चव्हाणांचा पवारांशी पंगा
पृथ्वीराज चव्हाण आणि शरद पवार हा वाद आताचा नाही, तर तो 1999 पासून सुरू आहे. 1999 मध्ये जेव्हा शरद पवार यांनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादीची स्थापना केली, तेव्हा झालेल्या पहिल्याच लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने श्रीनिवास पाटील या नवख्या उमेदवाराला उमेदवारी दिली. या नवख्या उमेदवाराने पृथ्वीराज चव्हाण यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला. हा पराभव पृथ्वीराज चव्हाण यांच्या जिव्हारी लागला होता. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आले, तेव्हा त्यांनी राष्ट्रवादीला कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडली नाही. मुंबई बॉम्बस्फोटाची घटना घडली आणि कायदा व सुव्यवस्थेचे निमित्त करुन गृह खाते राष्ट्रवादीकडे ठेवण्याचा निर्णय चुकीचा ठरला, असे विधान करुन त्यांनी राष्ट्रवादीवर हल्ला केला. राज्य बँकेवरील राष्ट्रवादीच्या वर्चस्वाला त्यांनी जोरदार धक्का दिला. त्यानंतर सिंचन क्षेत्रावर श्वेतपत्रिका काढण्याचे जाहीर करुन, त्यांनी राष्ट्रवादीकडील जलसंपदा खात्याच्या कारभाराला संशयाच्या पिंजऱ्यात उभे केले. त्याचमुळे आता पृथ्वीराज चव्हाण यांना राष्ट्रवादीने विरोध केल्याची माहिती मिळत आहे. आता पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाला पसंती देत शिवसेना नेमकं काय साधू पाहतेय, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
(हेही वाचाः पृथ्वीराज ‘बाबां’ची पवारांना आजही वाटते भीती)
Join Our WhatsApp Community